मॉडलिंग सोडलं, खिचडी विकली; २०८ आठवड्यांत 'या' मुलीनं उभी केली कोट्यवधींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 09:48 AM2023-10-03T09:48:15+5:302023-10-03T10:24:32+5:30

खिचडीच्या चवीच्या जोरावर त्यांनी ५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

जी खिचडी तुम्ही जेवणाच्या ताटात पाहून वेगळा चेहरा बनवता किंवा ज्याला तुम्ही आजारी लोकांचे अन्न समजता, त्या खिचडीत इतकी ताकद आहे त्याच्या जोरावर आज कोट्यवधींची कंपनी उभी केली आहे.

खिचडी विकून कोणी कोट्यधीश कसं बनू शकतं किंवा कोणी खिचडीचा व्यवसाय कसा सुरू करू शकतो हे तुम्हाला थोडं निराळं वाटेल. पण हे अगदी खरं आहे. मुंबईत राहणाऱ्या आभा सिंघल यांनी खिचडीच्याच जोरावर कोट्यवधींची कंपनी उभी केली. मॉडेल आणि नंतर उद्योजक बनलेल्या आभा यांनी खिचडीसारख्या पदार्थांचे व्यवसायात रूपांतर केलंय.

खिचडी एक्सप्रेस ही स्टार्टअप कंपनी आहे. त्यांची देशभरात अनेक आऊटलेट्स आहेत. या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारच्या खिचडीचा आस्वाद घेता येतो. आउटलेट्स व्यतिरिक्त, तुम्ही स्विगी, झोमॅटो सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खिचडी एक्सप्रेसवरून तुमच्या आवडीची खिचडी ऑर्डर करू शकता.

खिचडी व्यतिरिक्त पकोडे आणि स्थानिक पदार्थही या ठिकाणी सर्व्ह केले जातात. ४ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या स्टार्टअपच्या संस्थापक आभा सिंघल यांनी आपल्या खिचडीच्या चवीच्या जोरावर साध्या खिचडीतून ५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

आभा यांचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांचं बालपण संघर्षात गेले. त्या १२ वर्षांच्या असताना त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला. घराऐवजी त्यांचं बालपण हॉस्टेल आणि बोर्डिंग स्कूलमध्ये गेलं. आपल्या आयुष्यातील आव्हानं लक्षात घेऊन आभानं एमबीए करण्याचा निर्णय घेतला. त्या आभ्यासात हुशार होत्या, म्हणून त्यांनी लंडनमधून एमबीए केलं.

याचदरम्यान त्या खिचडी बनवायला शिकल्या. सहज बनवणारी खिचडी आभा आणि तिच्या मैत्रिणींना खूप मदत करणारी होती. स्वस्त आणि झटपट तयार होणाऱ्या खिचडीचे अनेक फ्लेवर त्यांनी तयार केले. आभा यांनी बनवलेली खिचडी त्यांच्या मित्रपरिवारात खूप लोकप्रिय झाली. शिक्षण पूर्ण करून त्या भारतात परतल्या. काही वर्षानंतर त्यांना आता सर्वकाही ठीक असेल असं वाटलं, पण तसं झालं नाही.

घरी परतल्यानंतर दररोजच्या वादामुळे कंटाळून त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. २ जोडी कपडे घेऊन त्या घराबाहेर पडल्या. त्या आपल्या मैत्रीणीच्या भाड्याच्या घरात राहायला गेल्या. एकेदिवशी एका जाहिरात दिग्दर्शकाच्या त्या संपर्कात आल्या. त्यानंतर त्यांना मॉडलिंगच्या ऑफर मिळाल्या. सॅमसंग, कॅडबरी, कल्याण ज्वेलर्स अशा अनेक कंपन्यांच्या त्यांनी जाहिराती केल्या. परंतु हे दीर्घकाळ चालणार नाही, असं त्यांना वाटत होतं.

३ वर्ष जाहिरात क्षेत्रात काम केल्यानंतर एकदा त्यांना त्यांच्या जवळच्या मित्रानं खिचडीची आठवण करून दिली. आपल्या मित्राचा सल्ला मानत त्यांनी खिचडी एक्स्प्रेसची (Khichdi Express) सुरुवात केली. अनेकांनी यानंतरही त्यांना अनेक प्रश्न केले. परंतु याकडे दुर्लक्ष करत त्यांनी आपल्या मनाचं ऐकलं आणि काम सुरू ठेवलं.

कोरोनादरम्यान त्यांच्या व्यवसायाची वाढ झाली. लोकांना हलकं आणि सहज पचणारं अन्न हवं होतं. अशात त्यांचा खिचडीचा व्यवसाय चालू लागला. ४ वर्षांमध्ये त्यांनी अनेक शहरांमध्ये आऊटलेट्स सुरू केली. ४ वर्षांमध्ये त्यांची कंपनी ५० कोटींची झाली. लवकरच आपली कंपनी १०० कोटींची व्हावी असं ध्येय त्यांनी ठेवलं आहे.