सरकारी नोकरी सोडली, लोकांना देऊ लागले शुद्ध पाणी; बनवली ११०० कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 10:37 AM2023-09-16T10:37:38+5:302023-09-16T10:48:01+5:30

कोणती कल्पना कोणाचं नशीब कधी पालटेल सांगता येत नाही. असंच काहीसं घडलं महेश गुप्ता यांच्यासोबत.

Success Story of Kent RO Founder Mahesh Gupta: जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हे नक्कीच मिळतंच. कोणती कल्पना कोणाचं नशीब कधी पालटेल सांगता येत नाही. असंच काहीसं घडलं महेश गुप्ता यांच्यासोबत.

महेश गुप्ता यांचा जन्मही मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील अर्थ मंत्रालयात सेक्शन ऑफिसल होती. त्यांचं संपूर्ण शिक्षण दिल्लीतच झालं. त्यांनी आपलं शालेय शिक्षण लोधी रोड येथून पूर्ण केलं.

त्यानंतर त्यांनी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला. तिथून त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. नंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम, डेहराडून येथून पेट्रोलियममध्ये मास्टर्स केलं. शिक्षणानंतर महेश यांना इंडियन ऑईलमध्ये नोकरी मिळाली.

इंडियन ऑईलमध्ये ते चांगल्या पगारावर काम करू लागले. पण त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. यासाठी त्यांनी १९८८ मध्ये नोकरी सोडून ऑइल मीटरचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायासाठी त्यांनी नोएडा येथे प्लांट उभारला.

एकदा त्यांची मुलं खूप आजारी पडली. दूषित पाणी प्यायल्यानं हा आजार झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी बाजारात उपलब्ध असलेले वॉटर प्युरिफायर हे अल्ट्राव्हायोलेट तंत्रज्ञानावर आधारित असल्याचेही त्यांना आढळून आले, जे पाणी पूर्णपणे शुद्ध करण्यास सक्षम नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःसाठी रिव्हर्स ऑस्मोसिसवर आधारित प्युरिफायर बनवण्याचा निर्णय घेतला

महेश यांनी सांगितलं की, पहिला आरओ बनवण्यासाठी त्यांना अंदाजे ४०-५० हजार रुपयांचा खर्च आला. त्यासाठी त्यांनी परदेशातून सुटे भाग आणले होते. नंतर आरओचे फायदे पाहून इतर लोकांनीही स्वतःसाठी अशा मशीनची मागणी केली. महेश गुप्ता यांनी त्यात व्यवसायाच्या शक्यता पाहिल्या आणि आरओ व्यवसायात उडी घेतली.

१९९८ मध्ये त्यांनी आरओ बनवण्यास सुरुवात केली. त्यावेळी ते एक आरओ २० हजार रुपयांपर्यंत विकत होते. तो बाजारातील इतर प्युरिफायरच्या तुलनेत खूपच महाग होता. पण उत्पादनाचा दर्जा पाहून लोकांना तो आवडू लागला आणि लोक खरेदी करू लागले. हळूहळू त्यांच्या या व्यवसायानं अनेक शिखरं गाठली.

आज केंट आरओचं बिझनेस व्हॅल्युएशन कोटींमध्ये आहे. महेश गुप्ता यांच्या मते, कंपनीनं गेल्या वर्षी ११०० कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. आज कंपनी RO व्यतिरिक्त इतर अनेक उत्पादने बनवत आहे. नवीन व्यावसायिकांना सल्ला देताना महेश सांगतात की, आज लोक पैसा डोळ्यासमोर ठेवून व्यवसाय सुरू करत आहेत. परंतु तो प्रोडक्टवर आधारित असला पाहिजे. यामुळे लोकांना मदत झाली पाहिजे, असंही ते म्हणतात.