होऊ दे खर्च! सणासुदीच्या काळात खरेदी वाढणार; बाजार बहरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 12:32 PM2022-09-26T12:32:17+5:302022-09-26T12:44:43+5:30

सणासुदीत ३ पैकी १ कुटुंब १०,००० रुपयांपेक्षा अधिकची खरेदी करणार

कोरोना संकटानंतर देशात सणासुदीची जोरदार खरेदी सुरू झाली असून, ती आता नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत. त्यामुळे या सणासुदीसाठीही ग्राहकही तयार झाले आहेत. यंदा तीनपैकी एका कुटुंबाने सणासुदीत १०,००० रुपयांहून अधिक खर्च करण्याचे नियोजन केले असल्याचे एका अहवालात समोर आले आहेत.

लोकल सर्कलच्या सर्वेक्षण अहवालात ही माहिती समोर आली. जे लोक खरेदी करणार आहेत, त्यातील जवळपास जवळपास निम्मे स्टोअर, मॉल्स आणि मार्केटमधून खरेदी करतील. यामुळे मॉलमधील विक्रीत २० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकल सर्कलचे संस्थापक आणि अध्यक्ष सचिन तापडिया म्हणाले की ३३ टक्के कुटुंब या सणांसाठी १०,००० ते १ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यास तयार आहेत. परंतु, अशीही ३५ टक्के कुटुंबे आहेत ज्यांच्याकडे सणासुदीत अतिरिक्त खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे ते थेट खरेदीच टाळणार आहेत.

४९% लोक बाजारात जाऊन दुकानातून खरेदी करणार आहेत. ३१% लोक किंमत पाहूनच वस्तू खरेदीचा विचार करत आहेत. २० ग्रॅम सोने खरेदी धनत्रयोदशीला होणार. २४% जण प्रवासासाठी पैसे मोजणार.

चालू आर्थिक वर्षात जुलै वगळता प्रत्येक महिन्यात एप्रिल ते ऑगस्टपर्यंत दुचाकींच्या विक्रीत वाढ झाली आहे. वाहन विक्रेत्यांची संघटना असलेल्या फाडाच्या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या ६१.२. टक्के डीलर्सनी दुचाकी विक्री दुहेरी अंकांमध्ये म्हणजेच सप्टेंबरमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढण्याची अपेक्षा केली आहे.

गेल्या दोन वर्षांतील आकडेवारीनुसार, दुसरी सहामाही (जुलै-डिसेंबर) मध्ये ६६ ते ६७ लाख दुचाकींची विक्री झाली होती. या अर्थाने या वर्षाच्या उत्तरार्धात विक्रीचा आकडा ७० ते ७५ लाख (१२ टक्के अधिक)पर्यंत जाऊ शकतो.