गहू-तांदूळनंतर आता एसी अन् फ्रीजचेही दर वाढले; एप्रिलपर्यंत १० टक्क्यांनी महागणार इलेक्ट्रॉनिक वस्तू, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 05:19 PM2022-01-09T17:19:30+5:302022-01-09T17:26:28+5:30

नववर्षात महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. कारण इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती आता वाढल्या आहेत. नेमकं कोणकोणत्या वस्तूंच्या किमतीत वाढ झालीय आणि त्यामागची कारणं जाणून घेऊयात...

नववर्षात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढताना दिसत आहेत. त्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटनं महागाईच्या आगीत आता तेल ओतण्याचं काम सुरू केलं आहे. आधी दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्याही किमती वाढण्यास सुरुवात झाली आहे.

नववर्षात एसी, फ्रीजच्या किमतीत मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळते आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे पार्ट बनवणाऱ्या कंपन्यांनीच महागाईचं रडगाणं सुरू केल्यामुळे एसी आणि फ्रीज उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनानाही किमती वाढवाव्या लागल्या आहेत.

एसी आणि फ्रीजसोबतच वॉशिंग मशीनच्या किमतीत देखील वाढ होताना पाहायला मिळत आहे. जानेवारीच्या अखेरपर्यंत वॉशिंग मशीनच्या किमतीत ५ ते १० टक्क्यांनी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

एसी आणि फ्रीज बनवणाऱ्या कंपन्या जसं की पॅनासॉनिक, एलजी, हायर कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमतीत वाढ केली आहे. दुसरीकडे सोनी, हिटची, गोदरेज अप्लायन्सेस सारख्या कंपन्यांनी देखील या तिमाहीच्या अखेरपर्यंत दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्स तयार करणाऱ्या कंपन्या जानेवारी ते मार्चच्या दरम्यान ५.७ टक्क्यांपर्यंत उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. तर काही कंपन्यांनी याआधीच वाढ देखील करण्यास सुरुवात केलेली आहे.

हायर अप्लायन्सेस इंडियेचे अध्यक्ष सतीश एनएस यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत कमॉडिटी, परेदशी सामानांची आयात आणि कच्च्या मालावरील खर्चात वाढ झाल्यानं इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत वाढ करावी लागत आहे. हायर कंपनीनं फ्रीज, वॉशींगमशीन आणि एसीच्या दरात ३ ते ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. तर पॅनासॉनिक कंपनीनंही एसीच्या दरात ८ टक्क्यांची वाढ केली आहे. लवकरच आणखी वाढ होण्याचीही शक्यता कंपन्यांनी वर्तवली आहे.

पॅनासॉनिक इंडियाचे डिव्हिजनल डायरेक्टर फुमियासू फुजिमोरी यांनी दिलेल्या माहितीनुसार पॅनासॉनिक कंपनीच्या एसीच्या दरात ८ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. यात आणखी वाढ होण्याचीही शक्यता आहे. कच्चा माल आणि पुरवढा साखळीवरील खर्चात वाढ झाल्याचा फटका कंपनीला बसत असल्याचं ते म्हणाले.

दक्षिण कोरिआची इलेक्ट्रॉनिक कंपनी असलेल्या 'एलजी'नं देखील घरगुती इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विभागातील उत्पादनांमध्ये वाढ केली आहे. उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता पण टिकाऊ उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वस्तूंच्या किमतीत वाढ करणं गरजेचं होऊन बसलं होतं. त्यामुळे वाढ करावी लागत आहे, असं एलजीचे बिझनेस व्हाइस प्रेसिडंट दीपक बसल यांनी सांगितलं.

जर आता दरात वाढ होत आहे तर भविष्यात दर कमी देखील होऊ शकतात कारण सारंकाही मागणी व पुरवठ्यावर अवलंबून आहे, असं तज्ज्ञ सांगत आहेत. जर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कच्च्या मालाच्या दरात घट झाली तर अनेक वस्तूंच्या किमतीत मे महिन्यापर्यंत घट होऊ शकते, असं सांगितलं जात आहे.