LPG गॅसनंतर आता गाडी चालवणे महागणार! जागतिक तणावामुळे पेट्रोलच्या दरात मोठी वाढ; पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:18 IST2026-03-20T14:55:12+5:302026-03-20T15:18:35+5:30

Petrol Price increase : जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भू-राजकीय तणावाचे सावट आता थेट भारतीय इंधन दरांवर दिसू लागले आहे. याआधी एलपीजी गॅसचे दर ६० रुपयांनी वाढले होते. आता पेट्रोलच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये प्रीमियम पेट्रोलच्या दरात २.३० रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने हाय-ऑक्टेन इंधनाचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी चिंताजनक ठरली आहे.

ज्या गाड्यांना हाय-ऑक्टेन इंधनाची गरज असते, अशा आधुनिक इंजिनच्या कार आणि स्पोर्ट्स बाईक वापरणाऱ्या ग्राहकांना या दरवाढीचा थेट फटका बसेल.

प्रीमियम पेट्रोल हे उत्तम इंजिन परफॉर्मन्स आणि चांगल्या मायलेजसाठी ओळखले जाते. किमती वाढल्यामुळे अनेक ग्राहक आता साध्या पेट्रोलकडे वळण्याची शक्यता आहे.

अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, तज्ज्ञांच्या मते इराण-अमेरिका यांच्यातील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार हे या दरवाढीमागील मुख्य कारण आहे.

युद्धाच्या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय जलमार्गावरील वाहतूक खर्च वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम इंधन आयातीच्या खर्चावर होत आहे.

भारताप्रमाणेच व्हिएतनाममध्येही पेट्रोलच्या किमतीत २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तेथे ९५-ऑक्टेन गॅसोलीनची किंमत ३०,६९० वियतनामी डोंग (१.२० डॉलर) प्रति लिटरवर पोहोचली आहे.

आग्नेय आशियाई देशांमध्ये डिझेलच्या किमतीत ३४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ऊर्जा प्रकल्पांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे.

पश्चिम आशियातील तेल आणि गॅस साठ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे भविष्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, या भीतीपोटी अनेक देशांनी रातोरात किमती वाढवण्याचे धोरण स्वीकारले आहे.