फक्त 405 रुपये गुंतवा अन् 1 कोटी मिळवा; सरकार घेणार तुमच्या पैशांची हमी, पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 03:35 PM2024-02-28T15:35:08+5:302024-02-28T15:45:13+5:30

तुम्ही सुरक्षित योजनेच्या शोधात असाल, तर ही योजना तुमच्यासाठी आहे.

तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. या योजनेत तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि तुम्हाला त्यावर मोठे व्याजही मिळेल. ही देशातील सर्वात लोकप्रिय लहान बचत योजनांपैकी एक आहे. देशातील लाखो लोक पीपीएफमध्ये डोळे झाकून पैसे गुंतवतात. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीतील एक पैसाही बुडत नाही, कारण केंद्र सरकार या योजनेची हमी घेते.

PPF मध्ये किती गुंतवणूक करावी लागेल?- या सरकारी योजनेत तुम्ही वार्षिक किमान 500 रुपये गुंतवू शकता, तर कमाल मर्यादा 1.5 लाख रुपयांपर्यंत आहे. एका आर्थिक वर्षात ₹1.5 लाखांपेक्षा जास्त जमा केलेल्या रकमेवर कोणतेही व्याज मिळत नाही. रक्कम एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये जमा केली जाऊ शकते, त्याला काही मर्यादा नाही.

PPF वर किती व्याज मिळते?- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी बँका आणि पोस्ट ऑफिसमधील मुदत ठेवींपेक्षा जास्त व्याज देते. सध्या सरकार पीपीएफवर वार्षिक 7.1 टक्के व्याज देत आहे. या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज मिळते, ज्याची गणना वार्षिक आधारावर केली जाते. दरवर्षी मार्चमध्ये व्याज दिले जाते. दर तीन महिन्यांनी म्हणजे त्रैमासिक आधारावर व्याजदरांचे पुनरावलोकन केले जाते. व्याजदराबाबत अंतिम निर्णय अर्थ मंत्रालय घेते.

PPF वर कर सवलतीचा लाभ मिळतो का?- करमुक्तीच्या दृष्टिकोनातून ही एक उत्कृष्ट योजना आहे. त्यामुळे नोकरदार लोकांमध्ये ही खूप लोकप्रिय आहे. पीपीएफमध्ये पैसे जमा करुन तुम्ही चांगल्या रिटर्न्ससह कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला या योजनेत आयकराच्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळते, ज्याची कमाल मर्यादा रु. 1.5 लाख आहे.

किती वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल?- सरकारी नियमांनुसार पीपीएफ योजनेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. जर तुम्हाला मॅच्युरिटीनंतरही ही योजना चालू ठेवायचे असेल, तर तुम्ही पीपीएफ खाते 5 वर्षांसाठी वाढवू शकता. पीपीएफ विस्तारासाठीचा अर्ज मॅच्युरिटीच्या एक वर्ष आधी करावा लागेल.

PPF मधून पैसे कसे काढायचे?- या सरकारी योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे असला तरी, आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही ठेव रकमेच्या 50 टक्के रक्कम काढू शकता. यासाठी अट अशी आहे की, खाते उघडल्यानंतर 6 वर्षे पूर्ण झाली पाहिजेत, म्हणजेच 6 वर्षानंतरच रक्कम काढता येईल. पीपीएफ खाते तीन वर्षे चालवल्यानंतर तुम्ही त्यावर कर्जही घेऊ शकता.

पहिले कर्ज बंद झाल्यानंतरच दुसरे कर्ज मिळेल. पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 25 टक्के रक्कम तुम्ही कर्ज घेऊ शकता. पीपीएफच्या कर्जावर 2% जास्त व्याज द्यावे लागेल. उदाहरणार्थ, जर PPF वर सध्याचा व्याजदर 7.1 टक्के असेल, तर खातेदाराला कर्जावर 9.1 टक्के व्याज द्यावे लागेल. कर्जाची परतफेड जास्तीत जास्त 36 महिन्यांत करावी लागेल.

PPF खाते कोण आणि कुठे उघडू शकते? पीपीएफ खात्यात गुंतवणूक करणे सुरक्षित आहे. पोस्ट ऑफिससह देशातील जवळपास सर्व सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये तुम्ही पीपीएफ खाते उघडू शकता. यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तुम्ही अल्पवयीन मुलांच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकता, परंतु यासाठी पालक आवश्यक आहेत. मुलाच्या खात्यातून मिळणारी कमाई पालकांच्या उत्पन्नात जोडली जाते.

पीपीएफ खाते बंद करता येईल का?- नियमांनुसार पीपीएफ खाते उघडल्यानंतर 5 वर्षांपर्यंत ते बंद करण्याची परवानगी नाही. यानंतर केवळ काही प्रकरणांमध्ये ते बंद करण्याची तरतूद आहे. जसे की खातेदार, जोडीदार, मुले किंवा पालकांना जीवघेणे आजार. ही कारणे सांगितल्यावर वैद्यकीय कागदपत्रे दाखवणे आवश्यक आहेत. याशिवाय खातेधारकाच्या मृत्यूनंतर खाते आपोआप बंद होते.

पीपीएफमध्ये पैसे जमा करण्याबाबत हा विशेष नियम आहे का?- जर तुम्ही PPF मध्ये पैसे जमा करत असाल तर ते महिन्याच्या 5 तारखेपर्यंत जमा करा, म्हणजे तुम्हाला त्या संपूर्ण महिन्याचे व्याज मिळेल. जर तुम्ही पीपीएफ खात्यात त्या महिन्याच्या 6 तारखेपर्यंत किंवा शेवटच्या तारखेपर्यंत पैसे जमा केले तर पुढील महिन्यापासून त्यावर व्याज जोडले जाईल. प्रत्येक महिन्याच्या 5 व्या दिवसाच्या शेवटी किमान शिल्लक रकमेवर व्याज मोजले जाते.

PPF द्वारे करोडपती कसे होऊ शकतात? या सरकारी योजनेत थोडे थोडे पैसे जमा करून तुम्ही करोडपती होऊ शकता. सूत्र अगदी सोपे आहे. दररोज फक्त 405 रुपये, म्हणजेच वार्षिक 1,47,850 रुपये गुंतवायचे. यावर सध्याच्या 7.1% व्याजदराच्या आधारे तुम्ही 25 वर्षांत एकूण 1 कोटी रुपये उभारू शकता.