PPF मध्ये दरवर्षी ५० हजार गुंतवल्यास मॅच्युरिटीनंतर किती मिळतील? करातूनही मिळते मोठी सवलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 14:46 IST2026-03-30T14:38:57+5:302026-03-30T14:46:05+5:30

Post Office PPF Scheme : मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी केंद्र सरकारची 'पब्लिक प्रोव्हिडंट फंड' ही योजना अत्यंत लोकप्रिय आणि सुरक्षित मानली जाते. दीर्घकालीन बचतीसाठी ही योजना सर्वोत्तम असून, यामध्ये गुंतवणुकीवर आकर्षक व्याज आणि करात सवलत मिळते.

कमी गुंतवणुकीत सुरुवात: तुम्ही वर्षाला किमान ५०० रुपये भरून कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत पीपीएफ खाते उघडू शकता. वर्षाला जास्तीत जास्त १.५० लाख रुपये जमा करण्याची मर्यादा आहे.

सध्या पीपीएफ योजनेवर केंद्र सरकारकडून ७.१ टक्के दराने वार्षिक व्याज दिले जाते, जे अनेक बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा चांगले आहे.

तुम्ही वर्षातून एकदाच एकरकमी पैसे जमा करू शकता किंवा तुमच्या सोयीनुसार जास्तीत जास्त १२ हप्त्यांमध्येही गुंतवणूक सुरू ठेवू शकता.

पीपीएफ खाते १५ वर्षांनी मॅच्युअर होते. उदाहरणार्थ, जर तुम्ही दरवर्षी ५०,००० रुपये गुंतवले, तर १५ वर्षांनंतर तुम्हाला १३,५६,०७० रुपये मिळतील. यामध्ये तुमचे ७.५० लाख रुपये मुद्दल आणि ६,०६,०७० रुपये व्याजाचा समावेश असेल.

पीपीएफ खात्यावर गुंतवणूकदारांना गरज पडल्यास कर्जाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते.

जर तुम्ही एखाद्या वर्षी किमान ५०० रुपये जमा केले नाहीत, तर खाते बंद होते. मात्र, ठराविक दंड भरून तुम्ही हे खाते पुन्हा सक्रिय करू शकता.

खाते उघडल्यापासून पहिल्या ५ वर्षांपर्यंत तुम्हाला पैसे काढता येत नाहीत. ५ वर्षांनंतर केवळ गंभीर आजार किंवा मुलांच्या शिक्षणासारख्या विशेष कारणांसाठीच अंशतः पैसे काढण्याची मुभा मिळते.

ही योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जात असल्याने यामध्ये तुमची मुद्दल आणि व्याज पूर्णपणे सुरक्षित असते, तसेच यावर 'कलम 80C' अंतर्गत कर सवलतही मिळते.