Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 09:46 IST2026-04-09T09:34:02+5:302026-04-09T09:46:24+5:30
Post Office Investment Scheme: प्रत्येक व्यक्ती आपल्या कष्टाच्या कमाईतून भविष्यासाठी काही ना काही रक्कम नक्कीच वाचवते. मात्र, महागाईच्या या काळात फक्त पैसे वाचवणं पुरेसं नसून, ते पैसे योग्य आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवणं तितकेच महत्त्वाचं आहे.

Post Office Investment Scheme: प्रत्येक व्यक्ती आपल्या कष्टाच्या कमाईतून भविष्यासाठी काही ना काही रक्कम नक्कीच वाचवते. मात्र, महागाईच्या या काळात फक्त पैसे वाचवणं पुरेसं नसून, ते पैसे योग्य आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवणं तितकेच महत्त्वाचं आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या अल्प बचत योजना एक उत्तम पर्याय ठरतात.

सरकारी हमी असल्यामुळे या योजनांमध्ये जोखीम शून्य असते आणि परतावा देखील चांगला मिळतो. अशीच एक योजना म्हणजे 'पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट' (RD), जी तुमच्या छोट्या बचतीला काही वर्षांत मोठ्या फंडात बदलू शकते. या योजनेचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमच्या जमा रकमेवर केवळ व्याजाच्या माध्यमातून ४.४० लाख रुपयांची अतिरिक्त कमाई करू शकता.

१८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा कोणताही भारतीय नागरिक जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे खातं उघडू शकतो. विशेष म्हणजे, या योजनेत गुंतवणुकीची सुरुवात अवघ्या १०० रुपयांपासून केली जाऊ शकते. सध्या सरकार या ठेवींवर ६.७ टक्के दरानं आकर्षक व्याज देत आहे.

साधारणपणे या आरडी योजनेची मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षांचा असतो. जे लोक मध्यम मुदतीचे ध्येय ठेवून गुंतवणूक करत आहेत त्यांच्यासाठी ही योजना उत्तम आहे. मात्र, गुंतवणुकीचा खरा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही हे खाते मॅच्युरिटीनंतर पुढील पाच वर्षांसाठी वाढवता.

याशिवाय गुंतवणुकीत लवचिकताही देण्यात आली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत पैशांची गरज भासल्यास, खातेधारक तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे खातं मुदतीपूर्वी बंद करू शकतात. दुर्दैवानं खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, वारसाकडे खातं पुढे सुरू ठेवण्याचा किंवा जमा रकमेवर दावा करण्याचा पर्याय असतो.

पोस्ट ऑफिस आरडी केवळ गुंतवणूकच नाही, तर कठीण काळात आधार देखील ठरतं. खातं उघडल्यानंतर एक वर्षानंतर जमा रकमेच्या आधारे कर्ज घेण्याची सुविधा मिळते. नियमानुसार, एक वर्षाच्या नियमित जमा रकमेनंतर तुम्ही खात्यातील एकूण रकमेच्या ५० टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकता. बाजारात मिळणाऱ्या महागड्या वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत हे अधिक सोयीचे पडतं, कारण यावर लागणारं अतिरिक्त व्याज केवळ २ टक्के असतं.

समजा तुम्ही तुमच्या दैनंदिन कमाईतून दररोज ३०० रुपये बाजूला काढता. या हिशोबानं महिन्याची एकूण बचत ९,००० रुपये होईल. ही रक्कम दरमहा पोस्ट ऑफिस आरडीमध्ये जमा केल्यास, पाच वर्षांनंतर तुमची एकूण गुंतवणूक ५.४० लाख रुपये होईल आणि व्याजासह हा फंड ६ लाखांच्या पुढे जाईल.

जर तुम्ही ही गुंतवणूक न थांबवता पुढील पाच वर्षांसाठी वाढवली (म्हणजेच एकूण १० वर्षांची गुंतवणूक), तर तुमची एकूण जमा रक्कम १०,८०,००० रुपये होईल. १० वर्षे पूर्ण झाल्यावर मॅच्युरिटी म्हणून तुम्हाला एकूण १५,२०,८८९ रुपये मिळतील. या एकूण रकमेमध्ये ४,४०,८८९ रुपये केवळ व्याजाचे असतील.

















