LPG सिलिंडरला 'टाटा'! देशात पीएनजी क्रांतीचा वेग वाढला; एका महिन्यात ८ लाख नवीन कनेक्शनचा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 11:34 IST2026-04-06T11:19:58+5:302026-04-06T11:34:19+5:30
PNG Connections : अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असताना, भारताने आता घराघरात पाईपद्वारे गॅस पोहोचवण्यावर भर दिला आहे. स्वयंपाकघरातील लाल सिलिंडरची जागा आता पिवळ्या पाईप्सनी घेतली असून, या बदलामुळे गॅस वितरणाचे स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे.

गेल्या महिनाभरात सरकारने आणि गॅस कंपन्यांनी मिळून तब्बल ८ लाख नवीन पीएनजी कनेक्शन दिले आहेत. हा आतापर्यंतचा एक मोठा विक्रम मानला जात आहे.

ज्यांच्या घरी पीएनजी कनेक्शन आले आहे, त्यांनी स्वेच्छेने आपले एलपीजी कनेक्शन सोडण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १६,००० हून अधिक लोकांनी आपले जुने गॅस कनेक्शन सरकारकडे जमा केले आहे.

स्वेच्छेने गॅस कनेक्शन सोडणाऱ्या नागरिकांचा गौरव करण्यासाठी सरकारने पोर्टलवर 'हॉल ऑफ फेम' तयार केले आहे. येथे अशा नागरिकांची माहिती प्रसिद्ध करून त्यांचा सन्मान केला जातो.

वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या पाईपलाईनद्वारे घराघरातील गॅसची १००% मागणी यशस्वीरीत्या पूर्ण केली जात आहे. म्हणजेच घरगुती वापरासाठी आता पीएनजी हा सर्वात सक्षम पर्याय ठरत आहे.

केवळ घरेच नाही, तर हॉटेल्स आणि उद्योगांसारख्या व्यावसायिक क्षेत्रातील गॅसची मागणीही आता ८०% पीएनजीद्वारे पूर्ण केली जात आहे.

गॅस वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. आता देशात सिलिंडरची ९५% बुकिंग ही ऑनलाईन माध्यमातून केली जात आहे.

गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी आता ९०% डिलिव्हरी ही 'ऑथेंटिकेशन कोड'द्वारे केली जात आहे. फेब्रुवारीमध्ये हा आकडा केवळ ५३% होता, जो आता मोठ्या प्रमाणात सुधारला आहे.

सुमारे ५० लाख सिलिंडरचा नियमित पुरवठा सुरू ठेवण्यासोबतच, आता पीएनजीचे जाळे देशभर पसरवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

















