कोट्यवधी PF खातेधारकांसाठी चांगली बातमी, आता फिक्स व्याज मिळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 11:35 IST2025-02-18T10:44:25+5:302025-02-18T11:35:25+5:30
EPFO News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कोट्यवधी खातेधारकांना निश्चित व्याजदर देण्यासाठी एक नवीन राखीव निधी (रिझर्व्ह फंड) तयार करण्याची योजना आखत आहे.

जर तुम्ही नोकरी करत असला आणि तुमच्या पगारातून पीएफ कापला जात असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कोट्यवधी खातेधारकांना निश्चित व्याजदर देण्यासाठी एक नवीन राखीव निधी (रिझर्व्ह फंड) तयार करण्याची योजना आखत आहे.
या निर्णयामुळे पीएफ खातेधारकांना दरवर्षी निश्चित व्याज मिळू शकेल आणि त्यांना शेअर बाजारातील चढउतारांपासून दिलासा मिळेल. हा फंड तयार करण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालय, ईपीएफओचे अधिकारी इंटर्नल स्टडी करत आहेत. दरम्यान, ईपीएफओद्वारे पीएफ फंडमधील एक निश्चित रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते.
अनेक वेळा ईपीएफओला एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) आणि इतर गुंतवणुकीवर कमी परतावा मिळतो. याचा फटका ईपीएफओ खातेधारकांना सुद्धा सहन करावा लागतो. जेव्हा शेअर बाजारात घसरण होते, तेव्हा त्याचा परिणाम ईपीएफओ गुंतवणुकीवर मिळणाऱ्या रकमेवरही होतो.
कमी परताव्यांमुळे ईपीएफओला पीएफवरील व्याजदर देखील कमी करावा लागतो. अशा समस्या टाळण्यासाठी ईपीएफओ एक रिझर्व्ह फंड तयार करण्याचा विचार करत आहे, जो गुंतवणुकीवरील परतावा स्थिर ठेवेल. यामुळे पीएफ खातेधारकांना शेअर बाजारातील परिस्थिती काहीही असो, दरवर्षी निश्चित व्याज मिळू शकेल.
हिंदुस्तान वेबसाइटमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, ईपीएफओ या योजनेअंतर्गत दरवर्षी मिळणाऱ्या व्याजाचा एक भाग बाजूला ठेवून रिझर्व्ह फंडमध्ये जमा करेल. ज्यावेळी शेअर बाजारात घसरण होईल आणि गुंतवणुकीतून कमी परतावा मिळेल, त्यावेळी या फंडाचा वापर करून व्याजदर स्थिर ठेवला जाईल. त्यामुळे ईपीएफओच्या सात कोटींहून अधिक खातेधारकांना याचा फायदा होईल.
अंतिम निर्णय कधी घेतला जाणार?
सध्या ही योजना सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या योजनेचा कामगार व रोजगार मंत्रालय आणि ईपीएफओचे अधिकारी अभ्यास करत आहेत. पुढील चार ते सहा महिन्यांत यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, १९५२-५३ मध्ये जेव्हा ईपीएफओ सुरू झाला, तेव्हा पीएफवर फक्त ३ टक्के व्याज मिळत होते. १९८९-९० पर्यंत ते १२ टक्क्यांपर्यंत वाढले, जे २०००-०१ पर्यंत तसेच होते. यानंतर वेळोवेळी त्यात बदल करण्यात आले. सध्या, २०२३-२४ मध्ये ईपीएफओचा व्याजदर ८.२५ टक्के आहे.
२८ फेब्रुवारीला महत्त्वाची बैठक होणार
२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी पीएफ व्याजदर निश्चित करण्यासाठी ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची (सीबीटी) २८ फेब्रुवारी रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत व्याजदर स्थिर ठेवण्याबाबत किंवा तो किरकोळ वाढवण्याबाबत चर्चा होऊ शकते. दरम्यान, व्याजदरात कपात होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे सांगितले जात आहे.