१३ वेळा वाढले पेट्रोल डिझेलचे दर: नेहमी ८० पैशांनीच का वाढते किंमत?, जाणून घ्या यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 08:10 PM2022-04-05T20:10:47+5:302022-04-05T20:29:44+5:30

Petrol-Diesel Prices Hike For 13th Time In 15 Days: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असून, गेल्या १५ दिवसांत १३ वेळा दरवाढ करण्यात आली आहे.

Petrol-Diesel Prices Hike For 13th Time In 15 Days: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असून, गेल्या १५ दिवसांत १३ वेळा दरवाढ करण्यात आली आहे. दरवाढीबाबत सांगायचं झालं तर या काळात पेट्रोलच्या दरात ९.२० रुपयांनी वाढ झाली आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike) दरात सातत्याने वाढ होत आहे. साडेचार महिने इंधनाच्या किमती स्थिर ठेवल्यामुळे जो तोटा सहन करावा लागला, त्याची किंमत तेल कंपन्या आता दररोज दर वाढवून सर्वसामान्यांकडून वसूल करत आहेत.

अलीकडची गोष्ट म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे दर १५ दिवसांत १३ वेळा वाढले आहेत. यापैकी दहा वेळा इंधनाच्या किंमतीत ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की बहुतांश इंधन कंपन्या कायम ८० पैशांनीच दर का वाढवतात.

पंधरा दिवसांत दहा वेळा म्हणा किंवा इंधन कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवताना बहुतेक वेळा ८० पैशांची वाढ करत असल्याचे दिसून येते. आता ८० पैसेच वाढवायचे सूत्र काय असा प्रश्न पडतो.

या संदर्भात एंजल कमोडिटीजचे संस्थापक आणि कमोडिटी तज्ज्ञ अनुज गुप्ता सांगतात की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यासाठी यापूर्वी इंधन कंपन्यांना एक परिपत्रक आले होते. ज्यात त्यांच्या किमतीत जास्तीत जास्त एक रुपयापर्यंत वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

परंतु यानंतर बराच विचार करून कंपन्यांनी आपली कमाल मर्यादा ८० टक्क्यांपर्यंत निश्चित केली. तेव्हापासून इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बहुतेक वेळा सर्वाधिक ८० पैसे प्रति लिटरची वाढ केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. अमर उजालानं यासंदर्भातील वृत्त दिलंय.

कमोडिटी तज्ज्ञ अनुज गुप्ता सांगतात की, तेल कंपन्या ज्याप्रकारे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती हळूहळू वाढवत आहेत, त्यानुसार लोकांवरचा बोजा वाढत आहे. त्याचबरोबर महागाईचा धोकाही वाढत आहे.

"आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दीर्घकाळ स्थिर ठेवल्याने देशातील तेल कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कंपन्या दररोज त्यांच्या किमती वाढवून हा तोटा भरून काढत आहेत. अलीकडच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचा ट्रेंड थांबण्याची अपेक्षा नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

इंधन कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ केली. गेल्या १५ दिवसांत २४ मार्च आणि १ एप्रिल असे दोनच दिवस इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. उर्वरित दिवसांमध्ये मात्र त्यात वाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, सततच्या वाढीनंतर दिल्लीत आतापर्यंत पेट्रोल ९.२० रुपयांनी महागले आहे.

दिल्लीत पेट्रोलचा दर आता १०४.६१ रुपये प्रतिलिटर झाला आहे, तर डिझेलचा दर ९५.८७ रुपये झाला आहे. विशेष म्हणजे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ४ नोव्हेंबर २०२१ पासून २१ मार्च २०२२ पर्यंत स्थिर होत्या. २२ मार्चपासून त्यात वाढ होऊ लागली.

तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरही परिणाम होतो. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती आपल्या २००८ नंतरच्या सर्वच्च पातळी १३९ डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचल्या होत्या. परंतु नंतर त्यात घसरण झाली. मंगळवारीही हे दर १०८ रुपये प्रति बॅरल इतके झाले आहेत.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीतील संकट अधिकच वाढल्याचे कमोडिटी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशीच परिस्थिती आणखी दीर्घकाळ राहिल्यास जनतेला आणखी महागाईचा भार सहन करावा लागेल, असेही ते म्हणाले.