पेट्रोल-डिझेलच्या दरात 2 रुपयांपर्यंत कपात होणार? जाणून घ्या सरकारचे प्लॅनिंग...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 12:02 PM2022-11-02T12:02:19+5:302022-11-02T12:20:46+5:30

petrol diesel price : कंपन्या आता तोट्याऐवजी नफा कमावत आहेत.

नवी दिल्ली. सरकार लवकरच ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपातीचे गिफ्ट देऊ शकते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांचे मार्जिनही वाढले आहे. कंपन्या आता तोट्याऐवजी नफा कमावत आहेत.

हे पाहता सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी कपात करू शकते. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्यास मे 2022 नंतर तेलाच्या किमतीत होणारी ही पहिली कपात असणार आहे.

मे महिन्यात सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. तेव्हा सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 6 रुपयांनी कमी केले होते. सरकारी तेल कंपन्यांना पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठे मार्जिन मिळू लागले आहे.

रिपोर्टनुसार, कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 6 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांपर्यंत मार्जिन मिळत आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, जर भारतीय रुपया आणि कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या पातळीवर राहिल्या तर सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी कपात करू शकते.

मात्र, यावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी किती चढ-उतार होऊ शकतात, हे पाहिले पाहिजे. सध्या, रशिया-युक्रेन युद्धाच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती खूपच कमी आहेत.

सरकारने मंगळवारी विंडफॉल टॅक्स म्हणजेच कंपन्यांच्या नफ्यातील वाटा कमी केल्याने देशांतर्गत बाजारातील तेलाच्या किमतींवरील दबाव आता कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

जर सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची कपात केली, तर जनतेला महागाईपासून दिलासा मिळेल. शिवाय, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला राजकीय फायदाही होईल आणि महागाईवरून विरोधकांच्या आरोपाला उत्तर देता येईल.

सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी त्यांच्या मार्जिनमध्ये घसरण आणि तोटा झाल्याची तक्रार मे महिन्यात केली होती. तेव्हा कंपन्यांनी सांगितले की, पेट्रोलवर प्रतिलिटर 10 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 14 रुपये नुकसान होत आहे.

इतकेच नाही तर इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमनेही संयुक्तपणे 19 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. मात्र, आता पुन्हा या कंपन्या नफ्यात परतल्या असून पेट्रोल आणि डिझेलवरील प्रतिलिटर मार्जिनही वाढू लागले आहे.