पॅन-आधार लिंकिंगची मुदत संपली! तुमचे पॅन कार्ड 'बंद' झालेय का? जाणून घ्या आता काय करावे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 12:19 IST2026-01-04T11:07:27+5:302026-01-04T12:19:35+5:30
PAN-Aadhaar Linking : पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी दिलेली ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत आता संपली आहे. आज ४ जानेवारी २०२६ उजाडली असून, ज्या करदात्यांनी अद्याप हे काम पूर्ण केलेले नाही, त्यांचे पॅन कार्ड आता तांत्रिकदृष्ट्या 'निष्क्रिय' झाले असण्याची शक्यता आहे. मात्र, घाबरून जाण्याचे कारण नाही; दंडासह तुम्ही हे काम अजूनही पूर्ण करू शकता.

ज्यांचे पॅन-आधार लिंक नाही, त्यांचे पॅन कार्ड आता अधिकृत व्यवहारांसाठी चालणार नाही. यामुळे बँक खाते उघडणे, केवायसी अपडेट करणे, ५० हजारांवरील व्यवहार करणे किंवा शेअर बाजारातील गुंतवणूक यांत अडचणी येऊ शकतात.

जर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय असेल, तर तुम्ही आर्थिक वर्ष २०२५-२६ चा आयटी रिटर्न फाईल करू शकणार नाही. तसेच तुमचे प्रलंबित रिफंडही अडकून पडू शकतात.

पहिले तुमचे पॅन आधीच लिंक आहे का हे तपासा. यासाठी प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर www.incometax.gov.in जाऊन 'Link Aadhaar Status' या पर्यायावर क्लिक करा. तिथे पॅन आणि आधार क्रमांक टाकल्यास तुमचे स्टेटस समजेल.

३१ डिसेंबरची डेडलाईन चुकली असली तरी तुम्ही तुमचे पॅन पुन्हा सक्रिय करू शकता. यासाठी तुम्हाला प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर जाऊन लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

मुदत संपल्यानंतर पॅन-आधार लिंक करण्यासाठी आता तुम्हाला १,००० रुपये इतका लेट फी (दंड) भरावा लागेल. हा दंड भरल्याशिवाय लिंकिंगची प्रक्रिया पुढे सरकणार नाही.

ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करा. 'Link Aadhaar' पर्यायावर जा. तुमचे पॅन आणि आधार तपशील भरा. दंड भरण्यासाठी 'e-Pay Tax' पर्याय निवडा. योग्य असेसमेंट इयर निवडून १,००० रुपयांचे चलन भरा. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर पुन्हा पोर्टलवर येऊन विनंती सबमिट करा.

तुम्ही दंड भरून लिंकिंगची विनंती केल्यानंतर, तुमचे पॅन कार्ड पुन्हा 'अॅक्टिव्ह' होण्यासाठी साधारणपणे ४ ते ५ कामकाजाचे दिवस लागू शकतात.

अनेक बँका आता निष्क्रिय पॅन कार्ड असलेल्या खात्यांवर निर्बंध घालत आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहारांत अडथळा नको असेल, तर आजच १,००० रुपये दंड भरून ही प्रक्रिया पूर्ण करणे हिताचे ठरेल.

जर तुम्ही पॅन-आधार लिंक केले नसेल, तर तुमचे टॅक्स डिडक्शन सुद्धा जास्त दराने (साधारण २०%) कापले जाऊ शकते. त्यामुळे विलंब न करता ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा.

















