'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 15:25 IST2025-05-07T15:22:20+5:302025-05-07T15:25:19+5:30

operation sindoor missile : 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर SCALP क्षेपणास्त्रे, हॅमर बॉम्ब आणि कामिकाझे ड्रोनने हल्ला केला. या शस्त्रांची किंमत लाखो-कोटींमध्ये आहे.

भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलं आहे. या कारवाईसाठी अत्यंत घातक आणि महागड्या शस्त्रांचा वापर भारतीय लष्कराने केला आहे.

या दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ले करण्यासाठी तिन्ही सैन्य दलांनी अत्यंत शक्तिशाली शस्त्रे वापरली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत स्कॅल्प क्रूझ क्षेपणास्त्रे, हॅमर प्रिसिजन बॉम्ब आणि लोटेरिंग बॉम्ब यासह लांब पल्ल्याच्या अस्त्रांचा वापर करण्यात आला.

स्कॅल्प क्षेपणास्त्राला स्टॉर्म शॅडो असेही म्हणतात. हे हवेतून सोडले जाणारे क्रूझ क्षेपणास्त्र असून २५० किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याचे लक्ष्य अचूक भेदू शकते. अनेक संरक्षण आणि वृत्तसंस्थांच्या मते, प्रति क्षेपणास्त्र युनिटची किंमत साधारणतः १ मिलियन डॉलर म्हणजे ८,४६,१८,११८ रुपये असते.

लष्कर आणि जैश-ए-मोहम्मद (जेईएम) सारख्या दहशतवादी गटांकडून प्रशिक्षण आणि रसद केंद्रे म्हणून वापरल्या जाणाऱ्या मजबूत बंकर आणि बहुमजली इमारतींवर हल्ला करण्यासाठी हॅमर (Highly Agile Modular Munition Extended Range) स्मार्ट बॉम्बचा वापर करण्यात आला.

५०-७० किलोमीटरच्या पल्ल्याच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी हॅमर बॉम्ब हे एक अचूक शस्त्र आहे. मिलिटरी इक्विपमेंट अँड एव्हिएशन गाइडच्या अहवालानुसार, हॅमर बॉम्बची प्रति युनिट किंमत सुमारे १००,००० डॉलर (८४,६२,५५० रुपये) आहे. याची किंमत बॉम्बच्या आकार आणि क्षमतेवर अवलंबून असते.

भारतीय सैन्याने हल्ला करण्यासाठी ड्रोनचाही वापर केला. याला लोइटरिंग म्युनिशन किवा 'कामिकाझे ड्रोन' असेही म्हणतात. २०२३ मध्ये कामिकाझे ड्रोनची प्रति युनिट किंमत १०,००० डॉलर (८,४६,२५५ रुपये) ते ५०,००० डॉलर असल्याचे नोंदवले गेले आहे.