New Rules 2023: नव्या वर्षात नवे नियम! खिशावर ताण, आजपासून क्रेडिट कार्ड, बँक लॉकरसह या गोष्टी बदलल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 08:44 AM2023-01-01T08:44:38+5:302023-01-01T08:55:19+5:30

काही बदल तर आपल्या खिशावर परिणाम करतात. या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी असेच काही महत्वाचे नियम बदलले आहेत.

प्रत्येक महिना सामान्य माणसासाठी काहीतरी नवीन घेऊन येत असतो. काही गोष्टींचे नियम बदलत असतात यामुळे त्यांच्या आयुष्यावर खूप फरक पडत असतो. काही बदल तर आपल्या खिशावर परिणाम करतात. या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी असेच काही महत्वाचे नियम बदलले आहेत.

नवीन वर्षात जीएसटी ई-इनव्हॉइसिंग आणि इलेक्ट्रॉनिक बिलाशी संबंधित नियमांमध्येही महत्त्वाचे बदल झाले आहेत. सरकारने जीएसटी ई-इनव्हॉइसिंगसाठी थ्रेशोल्ड मर्यादा 20 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपये केली आहे. जीएसटी नियमांमधील हे बदल 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील. अशा परिस्थितीत ज्या व्यापाऱ्यांची उलाढाल पाच कोटी रुपये किंवा त्याहून अधिक आहे त्यांना आता इलेक्ट्रॉनिक बिले काढणे आवश्यक होणार आहे.

रिझर्व्ह बँकेने बँक लॉकरबाबत नवीन निर्देश जारी केले आहेत. हे नियम आजपासून लागू झाले आहेत. यामुळे बँकांची मनमानी संपली आहे. जर लॉकरमधील वस्तूंना नुकसान झाले तर त्याची जबाबदारी आता बँकांवर राहणार आहे. यासाठी बँक आणि ग्राहकांमध्ये करार होणार आहे. हा करार ३१ डिसेंबरपर्यंत वैध राहणार आहे. बँका लॉकरशी संबंधीत बदललेल्या नियमांची माहिती ग्राहकांना एसएमएम आणि अन्य माध्यमांद्वारे देणार आहे.

आयकर विभागाने शनिवारी एक नोटीस जारी केली आहे. मार्च २०२३ अखेरपर्यंत आधारशी लिंक न केलेले पॅन (कायम खाते क्रमांक) निष्क्रिय केले जाणार आहेत. हा बदल जानेवारीऐवजी एप्रिलच्या पहिल्या तारखेपासून लागू होणार आहे.

नवीन वर्ष 2023 मध्ये नवीन वाहने खरेदी करणे महागडे ठरू शकते. MG Motor, Maruti Suzuki, Hyundai Motors, Honda, Tata Motors, Renault, Audi आणि Mercedes-Benz या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. टाटा उद्यापासून किंमती वाढविणार आहे. होंडानेही आपल्या वाहनांच्या किमती 30,000 रुपयांनी वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

१ जानेवारी २०२३ पासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. परंतु कमर्शिअल सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबईत कमर्शिअल गॅस सिलिंडरची किंमत १७२१ रुपये झाली आहे.

1 जानेवारी 2023 पासून क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी नियमांमध्ये बदल होणार आहे. हा बदल क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंटशी संबंधित आहे. HDFC बँक तिच्या क्रेडिट कार्ड पेमेंटवर मिळालेले रिवॉर्ड पॉइंट बदलणार आहे. अशा परिस्थितीत, ग्राहकांना 31 डिसेंबर 2022 पूर्वी त्यांच्या क्रेडिट कार्डमध्ये उर्वरित सर्व रिवॉर्ड पॉइंट्स मिळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख संपली आहे. 31 डिसेंबर 2022 ला आयकर भरण्याची ज्यांची तारीख चुकली त्यांना आता आयकर विभागाच्या नोटीसची वाट पहावी लागणार आहे. 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. तसेच या लोकांना 6 महिने ते 7 वर्षे तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.