शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 11:59 IST

1 / 7
New Apple CEO John Ternus: टेक जायंट Apple ने आपल्या नेतृत्वात एका मोठ्या फेरबदलाची घोषणा केली आहे. कंपनीने जॉन जर्नस यांची Apple च्या मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणजचे CEO पदावर नियुक्ती केली आहे. ते येत्या १ सप्टेंबरपासून विद्यमान CEO Tim Cook यांची जागा घेतील. तसेच, मागील १५ वर्षांपासून सीईओ पदावर कार्यरत असलेल्या टिम कुक यांना ‘एक्झिक्युटिव्ह चेअरमन’ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
2 / 7
५० वर्षीय जॉन टर्नस हे Apple मधील अशा मोजक्याच कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत, ज्यांनी कंपनीच्या सर्वात लोकप्रिय उत्पादनांना आकार देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ॲपलशी गेल्या जवळपास २५ वर्षांपासून जोडलेले टर्नस हे 'उत्पादन-केंद्रित' नेते म्हणून ओळखले जातात. तंत्रज्ञान आणि युजर एक्सिरीयन्स यांची अत्यंत सहजतेने सांगड घालण्यात विशेष नैपुण्य असलेले अभियंता म्हणून त्यांची ख्याती आहे.
3 / 7
टर्नस यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियामधून यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. ॲपलमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी 'व्हर्च्युअल रिसर्च सिस्टिम्स' येथे काम केले होते. ते २००१ मध्ये ॲपलमध्ये दाखल झाले आणि २०१३ मध्ये 'हार्डवेअर इंजिनिअरिंग'चे उपाध्यक्ष बनले. त्यानंतर, २०२१ मध्ये ते कंपनीच्या कार्यकारी मंडळात सामील झाले. जॉन सध्या कंपनीचे हार्डवेअर इंजिनिअरिंग प्रमुख आहेत. गेल्या दोन दशकांत त्यांनी कंपनीत अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या असून, विशेषतः मॅकबुक उत्पादनांच्या विक्रीत वाढ घडवून आणण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो.
4 / 7
विविध अहवालांनुसार, जॉन टर्नस यांनी ॲपलच्या अनेक प्रमुख उत्पादनांच्या विकासाचे नेतृत्व केले आहे; यामध्ये आयफोन (iPhone), आयपॅड (iPad), मॅक (Mac), ॲपल वॉच (Apple Watch) आणि एअरपॉड्स (AirPods) यांचा समावेश आहे. अलीकडील काही वर्षांत, त्यांनी 'मॅक' (Mac) उत्पादनांच्या श्रेणीला नवसंजीवनी देण्यात आणि डिझाइनमधील नवनवीन कल्पना सादर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
5 / 7
जॉन टर्नस हे टिम कुक यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांच्या नियुक्तीनंतर कुक यांनी लिहिलेल्या पत्रात टर्नस यांना या भूमिकेसाठी “परफेक्ट निवड” असे संबोधले आहे. कुक यांच्या मते, टर्नस एक उत्कृष्ट इंजिनिअर आणि दूरदृष्टी असलेले विचारवंत आहेत, जे गेल्या २५ वर्षांपासून Apple साठी उत्पादने विकसित करत आहेत.
6 / 7
टर्नस यांच्याकडे CEO पदाची जबाबदारी अशा काळात येत आहे, जेव्हा Apple ला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि सेमीकंडक्टर तंत्रज्ञान क्षेत्रात तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आगामी काळात कंपनीच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
7 / 7
दरम्यान, टिम कुक यांनी २०११ मध्ये Steve Jobs यांच्या पश्चात CEO पद स्वीकारले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली Apple ने अभूतपूर्व वाढ नोंदवली. कुक यांच्या नेतृत्वात कंपनीचे बाजारमूल्य सुमारे ३.६ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले. २०१८ मध्ये Apple ही १ ट्रिलियन डॉलर मार्केट कॅप ओलांडणारी अमेरिकेतील पहिली कंपनी ठरली होती. आता Apple मध्ये होत असलेला हा नेतृत्व बदल कंपनीच्या पुढील दशकासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
टॅग्स :Apple Incअॅपल