शिक्षण सोडले, टॅक्सी चालवली, नंतर उभारली 42,000 कोटींची कंपनी; उद्योगपती मुकेश जगतियानी यांची यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 01:10 PM2023-04-08T13:10:13+5:302023-04-08T13:20:06+5:30

mukesh jagtiani : दुबईस्थित अब्जाधीश उद्योगपती मॅग्नेट मिकी म्हणजेच मुकेश जगतियानी यांची यशोगाथा खूपच रंजक आहे.

नवी दिल्ली : देशात आणि जगात यशस्वी उद्योगपतींबाबत अनेक किस्से ऐकायला मिळतात. त्यांची यशोगाथा लाखो तरुणांना प्रेरणा देते, ज्यांना आयुष्यात काहीतरी मोठे करायचे आहे. दरम्यान, आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका व्‍यक्‍तीची कहाणी सांगणार आहोत, ज्या व्यक्तीने देशात नाही तर परदेशात जाऊन यशाची पताका फडकवली आहे.

दुबईस्थित अब्जाधीश उद्योगपती मॅग्नेट मिकी म्हणजेच मुकेश जगतियानी यांची यशोगाथा खूपच रंजक आहे. एकेकाळी टॅक्सी चालवणाऱ्या आणि हॉटेलच्या खोल्या साफ करणाऱ्या या व्यक्तीने आज करोडोंची कंपनी स्थापन केली आहे. मुकेश जगतियानी यांचा जन्म कुवेतमध्ये झाला.

मुकेश जगतियानी यांनी चेन्नई आणि मुंबईतून शिक्षण पूर्ण केले. नंतर लंडनला जाऊन उच्च शिक्षण पूर्ण केले. पण मध्येच शिक्षण सोडून नोकरीला लागले. त्यांनी टॅक्सी चालवून आणि लंडनमध्ये हॉटेल क्लीनर म्हणून करिअरची सुरुवात केली. पण एका दु:खद घटनेनंतर त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण लागले.

मुकेश जगतियानी यांच्या आई-वडिलांचे अकाली निधन झाले. त्यानंतर मुकेश जगतियानी हे बहरीनला गेले, जिथे त्यांनी 1973 मध्ये आपल्या कुटुंबाकडून मिळालेले 6,000 डॉलर घेऊन चाइल्ड केअर व्यवसायात पाऊल ठेवले.

आपल्या मेहनतीमुळे आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी आपल्या उपक्रमाचा विस्तार करण्यास सुरुवात केली. आज मुकेश जगतियानी यांची भारतीय उपखंड आणि मध्य पूर्व ते आफ्रिका, आशिया आणि युरोपपर्यंत 20 हून अधिक देशांमध्ये 6,000 स्टोअर्स आहेत.

4 दशकांच्या कारकिर्दीत मुकेश जगतियानी यांनी एप्रिल 2023 पर्यंत 5.2 अब्ज डॉलर्स (42,800 कोटींहून अधिक) संपत्ती मिळवली आहे. मुकेश जगतियानी यांच्या दुबई-मुख्यालय असलेल्या लँडमार्क ग्रुपची कमाई 9.5 अब्ज डॉलर (78,000 कोटींहून अधिक) आहे.

मुकेश जगतियानी यांनी रेणुका जगतियानी यांच्याशी लग्न केले. त्या आज मोठ्या समूहाच्या सीईओ आणि अध्यक्ष आहेत. अब्जाधीश उद्योगपती मुकेश जगतियानी हे देखील आपल्या समाज कल्याण कार्यासाठी ओळखले जातात.

2000 मध्ये मुकेश जगतियानी यांनी LIFE (Landmark International Foundation for Empowerment) नावाने एक चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. ही ट्रस्ट भारतातील १ लाख निराधार मुलांच्या शिक्षणाचा आणि औषधांचा खर्च उचलते. याशिवाय ही ट्रस्ट चेन्नईमध्ये कम्युनिटी क्लिनिक तसेच वृद्धाश्रम चालवते.