LIC चा IPO नेमका कधी येणार? मोदी सरकारने दिली मोठी अपडेट; ‘त्या’ वृत्ताबाबत दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 12:41 PM2021-12-21T12:41:29+5:302021-12-21T12:46:59+5:30

LIC चा IPO या आर्थिक वर्षात येणार की नाही, याबाबत मोदी सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. पाहा, डिटेल्स...

आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत असले तरी हजारो गुंतवणूकदारांना आस लागली आहे ती LIC च्या IPO ची. गेल्या काही महिन्यांपासून याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत.

चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत LIC चा IPO येण्याची शक्यता कमी असल्याचे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झाले आहे. सरकारी कंपन्यांची देखभाल करणाऱ्या केंद्राच्या गुंतवणूक विभागाने या वृत्ताचे खंडन केले आहे.

मात्र, LIC चा IPO कधी येणार, याबाबतची निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. दीपमने म्हटले आहे की, एलआयसीचा आयपीओ या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत आणण्याची योजना आहे आणि त्यासाठी तयारी सुरू आहे.

केंद्र सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, LIC चा IPO या आर्थिक वर्षात येणार नाही, अशी शक्यता काही माध्यमांनी वर्तवली आहे, ती चुकीची आहे.

LIC चे मूल्यांकन करण्यात आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ जात आहे आणि म्हणूनच त्याच्याशी संबंधित औपचारिकता पूर्ण झालेली नाही. याव्यतिरिक्त, एलआयसीचे मूल्यांकन पूर्ण करण्यात अनेक समस्या येत आहेत.

मर्चंट बँकरसह काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. जरी LIC चे मूल्यांकन झाले, तरी देखील नियामकशी संबंधित अशा अनेक प्रक्रिया आहेत, ज्या आयपीओच्या आधी पूर्ण कराव्या लागतात.

मर्चंट बँकरसह काम करणाऱ्या कामगार अधिकाऱ्याने सांगितले की, कोणत्याही कंपनीचा आयपीओ आणण्यापूर्वी फक्त भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ म्हणजेच सेबीलाच याबद्दल संपूर्ण माहिती द्यावी लागत नाही, तर कंपनीच्या नियामकांकडूनही मंजुरी मिळवावी लागते.

LIC जगातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक आहे. त्याच्या मूल्यांकनात अनेक समस्या येत आहेत, कारण त्याची मोठी आकार असलेली उत्पादने, रियल स्टेट अॅसेट, सहयोगी कंपन्या आणि नफ्याचे वाटप करण्याच्या संरचना खूप जटिल आहेत.

मूल्यांकनानंतर एलआयसीच्या शेअर विक्रीचा आकार निर्धारित केला जाऊ शकतो. भारतात कंपनी शेअर बाजारमध्ये सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया इतकी जटिल आहे की, एलआयसीचे मूल्यांकन पूर्ण केल्यानंतरही उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन ते चार महिने लागू शकतात.

त्यामुळेच LIC चा IPO चालू आर्थिक वर्षात येण्याची शक्यता जवळपास नाही, असा दावा मर्चंट बँकरशी संबंधित एका अधिकाऱ्याने केला आहे.

आता या आर्थिक वर्षात केवळ ३ महिने उरले आहेत. मूल्यांकनाचे काम पूर्ण होईपर्यंत शेअर विक्रीचा आकारही ठरवता येणार नाही. त्यात रिअल इस्टेट मालमत्ता आणि अनेक उपकंपनी युनिट्स आहेत, असेही सांगितले जात आहे.

भारत सरकार LIC आणि बीपीसीएलद्वारे १.७५ लाख कोटी रुपयांचे लक्ष्य पूर्ण करू इच्छित आहे. खाजगीकरणाबाबत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, सरकार योग्य मार्गावर असून या दिशेने अपेक्षेनुसार प्रगती करत आहे.