१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 16:03 IST2025-07-16T15:57:33+5:302025-07-16T16:03:32+5:30
Best Salary Jobs : मेटाने अॅपलच्या रुमिंग पँगला २०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे १६०० कोटी रुपये) पगार पॅकेजवर नियुक्त केले आहे.

सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंसची (AI) चर्चा सुरू आहे. या शर्यतीत पुढे राहण्यासाठी मेटा कंपनी सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग आपल्या नवीन 'सुपरइंटेलिजेंस लॅब'साठी जगातील सर्वात प्रतिभावान लोकांना एकत्र आणत आहेत. यासाठी ते अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, मेटा अॅपल (Apple), ओपनएआय (OpenAI), गुगल डीपमाइंड (Google DeepMind) आणि अँथ्रोपिक (Anthropic) सारख्या कंपन्यांमधील टॉप टॅलेंटला आकर्षित करण्यासाठी ८०० कोटी ते १,६०० कोटी रुपयांपर्यंतचे रेकॉर्डब्रेक पगार पॅकेजेस देत आहे! हे आकडे पाहून जगातील अनेक मोठ्या बँकांच्या सीईओंचे पगारही कमी वाटतील.
नुकतंच मेटाने अॅपलच्या रुमिंग पँगला (Ruoming Pang) तब्बल २०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे १६०० कोटी रुपये) पगार पॅकेजवर नियुक्त केले आहे. यापूर्वी, ओपनएआयमधील त्रिपित बन्सल यांनाही १०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ८०० कोटी रुपये) ऑफर करण्यात आले होते.
ब्लूमबर्गच्या मते, या पॅकेजेसमध्ये केवळ मूळ पगारच नाही, तर प्रचंड 'साइनिंग बोनस', कामगिरीवर आधारित अटी आणि इक्विटी (कंपनीतील मालकी हक्क) यांचा समावेश आहे. हे पॅकेजेस कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठ्या पगार यादींपैकी एक बनले आहेत.
'सुपरइंटेलिजेंस' ही एक अशी AI प्रणाली आहे जी सर्व क्षेत्रांमध्ये मानवी बुद्धिमत्तेला मागे टाकू शकते. ही आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेंस (AGI) पेक्षा खूप पुढे आहे, कारण AGI फक्त मानवांचे अनुकरण करण्यासाठी बनवली जात आहे.
सध्या ही संकल्पना सैद्धांतिक असली तरी, एआयच्या जगात ही एक मोठी आघाडी मानली जात आहे. 'सुपरइंटेलिजेंस' औषध, विज्ञान, अर्थव्यवस्था आणि सर्जनशीलता यांसारख्या क्षेत्रांतील अत्यंत गुंतागुंतीच्या समस्या सोडवू शकते, अशी अपेक्षा आहे.
मेटाची 'सुपरइंटेलिजन्स लॅब' (MSL) पुढील पिढीच्या AI विकासात ओपनएआय, गुगल डीपमाइंड आणि अँथ्रोपिकशी स्पर्धा करण्यासाठी तयार केली जात आहे. मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केले आहे की AI ही कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे, जगातील सर्वोत्तम प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी ते कोणताही पैसा देण्यास तयार आहेत.