महिंद्रा टेकओव्हर करणार ही दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी, 59.96% हिस्सा खरेदीची घोषणा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 15:53 IST2025-04-27T15:47:01+5:302025-04-27T15:53:58+5:30
Mahindra-SML Isuzu : या अधिग्रहणासह महिंद्रा अँड महिंद्राचा या क्षेत्रातील वाटा वाढणार.

Mahindra-SML Isuzu : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने SML Isuzu Ltd मधील 58.96 टक्के हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा प्रति शेअर 650 रुपयांच्या दराने 555 कोटींचे शेअर्स खरेदी करणार आहे. याशिवाय, सेबीच्या नियमांनुसार कंपनीच्या अधिग्रहणासाठी महिंद्रा अँड महिंद्रा ओपन ऑफरदेखील आणेल.
या करारांतर्गत, महिंद्रा अँड महिंद्रा एसएमएल प्रमोटर सुमितोमो कॉर्पोरेशनकडून 43.96 टक्के हिस्सा खरेदी करेल, तर एसएमएल इसुझू लिमिटेडच्या सार्वजनिक भागधारकांकडून 15 टक्के हिस्सा खरेदी करेल. यानंतर, महिंद्रा अँड महिंद्राला 26 टक्के हिस्सा खरेदी करावा लागेल. सेबीच्या नियमांनुसार, महिंद्राला अतिरिक्त 26 टक्के हिस्सा खरेदीसाठी ओपन ऑफर द्यावी लागेल.
या प्रस्तावित अधिग्रहणामुळे 3.5 टन व्यावसायिक क्षेत्रात महिंद्रा अँड महिंद्राचे स्थान आणखी मजबूत होईल. सध्या या विभागात महिंद्राचा वाटा 3 टक्के आहे. तर, 3.5 टन एलसीव्ही विभागात कंपनीचा वाटा 52 टक्के आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या अधिग्रहणानंतर त्यांचा बाजार हिस्सा 6 टक्क्यांपर्यंत वाढेल.
दरम्यान, IsuzuSML Isuzu लोकप्रिय ब्रँड असून, कंपनीचे देशभर अस्तित्व आहे. एसएमएल इसुझू ही आयएलसीव्ही सेगमेंटमधील एक आघाडीची कंपनी आहे. बस विभागात एसएमएल इसुझूचा एकूण वाटा 16 टक्के आहे. 2024 या आर्थिक वर्षात कंपनीचा ऑपरेटिंग महसूल 2196 कोटी रुपये होता. तर, या कालावधीत EBITDA 179 कोटी रुपये होता.
शुक्रवारी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे शेअर्स बीएसईवर 1.33 टक्क्यांनी घसरून 2862.20 रुपयांवर बंद झाले. एका वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किमती 36 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आता सोमवारी म्हणजेच उद्या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये असतील.
(हा गुंतवणूक सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)