भारतीय हवाई दलासाठी Mahindra बनवणार लढाऊ विमाने, ब्राझीलच्या कंपनीसोबत करार...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 05:27 PM2024-02-09T17:27:11+5:302024-02-09T17:36:48+5:30

थार आणि स्कॉर्पिओसारखी वाहने बनवणारी ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा भारतीय हवाई दलासाठी खास विमाने बनवणार आहे.

Mahindra Automobile: थार आणि स्कॉर्पिओसारखी वाहने बनवणारी भारतातील आघाडीची मोठी ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा (Mahindra) आता भारतीय हवाई दलासाठी विमाने बनवणार आहे. महिंद्राने ब्राझिलियन कंपनी एम्ब्रेरसोबत याबाबत करार केला आहे. आता या दोन्ही कंपन्या मिळून C-390 मिलेनियम मल्टीमिशन विमान बनवतील. विशेष म्हणजे, हे विमान पूर्णपणे भारतात बनवले जाईल.

हा करार भारत सरकारच्या मध्यम वाहतूक विमान खरेदी प्रकल्पांतर्गत करण्यात आला आहे. हे विमान बनवण्याचा कारखाना भारतातच उभारला जाईल. भारतीय हवाई दल (Indian Air Force) या विमानाचा वापर करेलच. पण, त्यापेक्षा येथे तयार होणारी विमाने परदेशात निर्यात केली जातील आणि त्यातून भारताचा मोठा फायदा होईल. यामुळे देशातील संरक्षण विमान उद्योगाला चालना मिळणार आहे.

C-390 मिलेनियम हे मध्यम आकाराचे वाहतूक विमान आहे. याचे पहिले उड्डाण 3 फेब्रुवारी 2015 रोजी ब्राझीलमध्ये झाले होते. ते 2019 मध्ये या विमानाला सर्वांसमोर सादर करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत अशाप्रकारची 9 विमाने तयार करण्यात आली आहेत. या विमानाचा वापर ब्राझील, पोर्तुगाल आणि हंगेरीच्या हवाई दलांकडून केला जातोय.

हे विमान उडवण्यासाठी दोन पायलट आणि एक लोडमास्टरची गरज असते. 26 हजार किलोग्रॅम वजन किंवा 80 सैनिक किंवा 74 स्ट्रेचर आणि 8 अटेंडंट किंवा 66 पॅराट्रूपर्स सोबत घेऊन उडण्याची क्षमता या विमानात आहे. 115.6 फूट लांबीच्या विमानाची उंची 38.10 फूट आहे, तर विंगस्पॅन 115 फूट आहे.

या विमानात एकावेळी 23 हजार किलोग्रॅम इंधन वाहून नेले जाऊ शकते, म्हणजेच संपूर्ण उपकरणांसह एकावेळी 5020 किलोमीटरपर्यंत उड्डाण करण्याची क्षमता या विमानाची आहे.

विमानाचा कमाल वेग ताशी 988 किलोमीटर आहे. विमान कमाल 36 हजार फूट उंचीवर उडू शकते. या विमानात काही प्रमाणात शस्त्रेही बसवता येतात, पण हे विमान प्रामुख्याने बचाव कार्यासाठी बनवण्यात आले आहे.