MSC Bank: राज्य सहकारी बँकेची दमदार कामगिरी; कोरोना काळात ३६९ कोटींचा निव्वळ नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 11:24 AM2021-06-25T11:24:27+5:302021-06-25T11:30:50+5:30

राज्य सहकारी बँकेने गेल्या आर्थिक वर्षात ३६९ कोटींचा निव्वळ नफ्याची नोंद केली आहे. यंदा नफ्यात १४ टक्के वाढ झाली.

मुंबई: गेल्या वर्षीपासून भारतात शिरकाव केलेल्या कोरोना विषाणूचा कहर अद्याप कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेवर झालेला दिसून आला.

मात्र, कोरोना संकटाच्या काळातही राज्य सहकारी बँकेने मोठी कामगिरी करत गेल्या आर्थिक वर्षात ३६९ कोटींचा निव्वळ नफ्याची नोंद केली आहे. यंदा नफ्यात १४ टक्के वाढ झाली.

दहा वर्षांपूर्वी आर्थिक अडचणीत असलेल्या राज्य बँकेवर रिझर्व्ह बँकेच्या आदेशांनुसार प्रशासकांची नेमणूक करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत कार्यरत असलेल्या प्रशासकांनी व्यवहारिक तत्वांवर बँकेचे संचलन केल्यामुळे राज्य बँक सुस्थितीत असल्याचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.

रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या निकषांपेक्षा बँकेची आर्थिक परिस्थिती जास्त सक्षम असल्याचे ते म्हणाले. २०२०-२१ या आर्थिक वर्षात बँकेची नेटवर्थ २७०३ कोटी असून त्यात १८ टक्के वाढ झाली. बँकेचा एकूण व्यवहार ४३६०३ कोटींवर गेला आहे.

भाग भांडवल ६१९ कोटी, निव्वळ नफा ३६९ कोटी आणि अनुत्पादक कर्जाचे निव्वळ प्रमाण १.२० टक्के आहे. बँकेची भांडवल पर्याप्तता १४.३४ टक्के आहे. बँकेला गेली ८ वर्षे सतत `अ' वर्ग प्राप्त होत आहे.

गेल्या ७ वर्षापासून बँक सभासदांना १० टक्के लाभांश देत असून, बँकेकडून दरवर्षी ५ कोटींची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येते. राज्य बँकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही वरिष्ठ नागरीकांकरिता त्यांच्या ठेवींवर एक टक्का अधिक व्याजदर देण्याचा निर्णय घेतला.

बँकेने सीटीएस क्लिअरिंगसारख्या अनेक सुविधा राज्य बँकेने सहकारी बँकांना उपलब्ध करुन दिल्या. सध्या बँकेने कोअर प्रणालीचे आधुनिककरण करण्याचे काम हाती घेतले आहे.

तसेच गरजू सहकारी बँकांसाठी `सायबर सिक्युरिटी' चा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विविध कार्यकारी सोसायटयांमार्फत शेतकऱयांना कर्जपुरवठा करणेची योजना बॅंकेने तयार केली असून ती मान्यतेसाठी नाबार्डकडे पाठविण्यात आली आहे.

या कामी सदर कर्जाचे नियंत्रण, वसुली व इतर सर्व व्यवस्थापन संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून केले जाईल, असे अनास्कर यांनी सांगितले.

राज्य बँकेस विदेश विनिमय व्यवहारासाठी रिझर्व्ह बँकेने अधिकृत परवाना दिला असून, आपल्या ग्राहकांना व अनेक नागरी सहकारी बँकांना व त्यांचे ग्राहकांना विदेश विनिमयाची तसेच एक्सपोर्ट व इंपोर्ट क्रेडिट लिमिट देत आहे. त्यांचे फॉरेक्स व्यवहार राज्य बँक समर्थपणे हाताळत आहे.