जणू व्हेल मासाच अवतरला, मुंबई विमानतळावर जगातील सर्वात मोठ्ठ विमान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 12:31 PM2022-11-23T12:31:58+5:302022-11-23T13:03:44+5:30

E2 फॅमिलीतील E195-E2 हे विमान नुकतेच मुंबई विमानतळावर उतरले. विमानतळावर काही माल उतरवल्यानंतर हे विमान निघून गेले.

महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी असलेलं शहर आहे. त्यामुळे, मुंबईत जगभरातून पर्यटक, बिझनेसमन आणि राजकीय नेतेमंडळीही येत असतात. त्यामुळे, येथे इंटरनॅशनल प्रवशी आणि विमानसेवाही कायम तत्पर असते.

बुधवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) जगातील सर्वात मोठे विमान उतरले. विशेष म्हणजे नागरी उपयोगासाठी हे विमान वापरण्यात येत असून 'एअरबस बेलुगा' (Airbus Beluga) असं याचं नाव आहे.

या विमानाबरोबरच प्रवासी वाहतुकीत जगात सर्वाधिक अत्याधुनिक असलेले 'एम्ब्रेअर ई 192-ई2' (Embraer E192-E2) प्रॉफिट हंटर हे विमानदेखील मंगळवारी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे. या दोन्ही मोठ्या विमानांची मुंबई विमानतळावरील ही पहिलीच ग्रँड एन्ट्री झाली.

एअरबस कंपनीचे 'ए300-600 एसटी' हे 'बेलुगा' नावे ओळखले जाणारे विमान 51 टन मालवाहू क्षमतेसह जगातील सर्वात मोठे विमान आहे. वैमानिक खाली व विमानाचा मुख्य भाग त्याच्या वर आहे.

खालील भागापेक्षा दुप्पटीने वरचा भाग मोठा आहे. अत्यंत वेगळ्या आकारातील हे विमान आहे. नागरी उपयोगातील अॅन्तोनोव्ह कंपनीचे 'एएन 124' व 'एएन 225', ही दोन विमाने सर्वाधिक मोठी होती.

या दोघांची सामान वाहून नेण्याची क्षमता ही 171 व 250 टन आहे. या तोडीचे अन्य कुठलेही विमान आतापर्यंत अस्तित्वात नव्हते. 'एएन 225' विमानाने दिल्ली मेट्रोसाठीचे डबे आणले गेले होते.

एअरबस बेलुगा या विमानाला अधिकृतपणे Airbus A300-608ST (सुपर ट्रान्सपोर्टर) असे म्हणतात. याला बेलुगा म्हणतात कारण त्याची रचना बेलुगा व्हेल माश्यासारखी आहे. या बेलुगा एअरबस सुपर ट्रान्सपोर्टर विमान जगातील सर्वात मोठे विमान आहे.

विमानाच्या कॅरिअरची लांबी 56 मीटर आणि उंची 17 मीटर एवढी आहे. रविवारी हे विमान कोलकाता विमानतळावर होते. तिथे इंधन भरण्यासाठी तसेच क्रू सदस्यांच्या विश्रांतीकरिता हे विमान थांबले होते.

E2 फॅमिलीतील E195-E2 हे विमान नुकतेच मुंबई विमानतळावर उतरले. विमानतळावर काही माल उतरवल्यानंतर हे विमान निघून गेले.

बेलुगा एअरबसचा वेग प्रचंड आहे. या विमानाचा कमाल वेग 864 किलोमीटर प्रति तास आहे. ते एकावेळी जास्तीत जास्त 27 हजार 779 किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकते. कमाल 35 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकते.