ना सौदी, ना इराण, ना रशिया..; 'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे साठे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 11:55 IST2025-07-03T11:49:28+5:302025-07-03T11:55:37+5:30

World's Largest Oil Reserve: जगात अनेक असे देश आहेत, ज्यांची अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या विक्रीवर चालते.

World's Largest Oil Reserve: जगातील अनेक देश कच्च्या तेलाच्या जोरावर चालत आहेत. कच्चे तेल जगातील सर्वात महत्वाचे नैसर्गिक संसाधनांपैकी एक आहे. पेट्रोल-डिझेलपासून ते विमान इंधनापर्यंत, कच्च्या तेलाच्या माध्यमातून व्यवसाय केला जातो आणि त्याच्या किमतीतील चढ-उतारदेखील अनेक देशांमध्ये महागाई वाढविण्यात किंवा कमी करण्यात मोठी भूमिका बजावतात.

ज्या देशांमध्ये तेलाचे साठे जास्त आहेत, तिथे कोणत्याही प्रकारची वाईट परिस्थिती उद्भवली, तर इतर देशांची चिंता वाढते. अशा परिस्थितीत, कोणत्या देशाकडे सर्वाधिक तेलाचे साठे आहेत, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

या देशात सर्वाधिक तेलाचे साठे-सौदी, इराण, इराक आणि रशिया सर्वाधिक कच्च्या तेलाचे साठे असल्याचे दावे करत असली, मात्र सर्वाधिक साठ्याच्या बाबतीत हे नंबर-१ देश नाहीत. वर्ल्डोमीटरवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर या बाबतीत व्हेनेझुएलाचे नाव आघाडीवर येते.

व्हेनेझुएलाकडे ३०३,००८ दशलक्ष बॅरल तेलाचा साठा आहे. तेलाने समृद्ध असूनही, या देशाची आर्थिक स्थिती खूपच वाईट आहे. ८० टक्क्यांहून अधिक लोक गरिबीत जगण्यास भाग पाडले जातात. जगातील सर्वाधिक महागाई दर असलेल्या टॉप-५ देशांच्या यादीतही या देशाचा समावेश आहे.

व्हेनेझुएला नंतर या देशांची नावे- व्हेनेझुएला नंतर सर्वाधिक तेल साठा असलेल्या टॉप-५ देशांबद्दल बोलायचे झाले तर, पुढील नाव सौदी अरेबियाचे येते. त्यांच्याकडे २६७,२३० दशलक्ष बॅरल तेल साठा आहे (२०२३ च्या आकडेवारीनुसार). ही एक अतिशय समृद्ध अर्थव्यवस्था असून, तेल उत्पादनात पुढे असण्यासोबतच, पर्यटन, तंत्रज्ञानासह इतर क्षेत्रांमध्येही ती पुढे आहे.

इराण तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांचा तेल साठा २०८,६०० दशलक्ष बॅरल आहे. त्यानंतर इराकचा चौथा क्रमांक लागतो. इराककडे १४५,०१९ दशलक्ष बॅरल आहेत. तर, सर्वाधिक तेल साठा असलेला पाचवा देश ११३,००० दशलक्ष बॅरलसह युएई आहे. याशिवाय कॅनडा, कुवेत आणि लिबिया सारखे देश देखील टॉप-१० यादीत समाविष्ट आहेत.

रशिया-अमेरिकेकडे इतके तेल- इराण आणि इराकसारख्या देशांची संपूर्ण अर्थव्यवस्था कच्च्या तेलावर आधारित आहे, तर असे अनेक देश आहेत ज्यांची अर्थव्यवस्था आधीपासून मजबूत आहेच, शिवाय त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तेलाचा साठा आहे. या यादीत अमेरिका, रशिया आणि चीनचा समावेश आहे. आकडेवारीनुसार, रशियाकडे ८०००० दशलक्ष बॅरल तेलाचा साठा असून, तो भारतासह इतर देशांना कच्च्या तेलाचा पुरवठा करतो. याशिवाय अमेरिकेकडे ४७,७३० दशलक्ष बॅरल तेलाचा साठा आहे, तर चीनकडे २७,८८९ दशलक्ष बॅरलचा साठा आहे.

सर्वात मोठ्या तेल आयातदारांमध्ये भारताचा समावेश-जगातील सर्वात मोठ्या तेल आयातदारांबद्दल बोलायचे झाले तर, चांगला तेल साठा असलेले अमेरिका आणि चीन या बाबतीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जास्त वापरामुळे ते तेल समृद्ध देशांकडून कच्च्या तेलाची आयात करतात. भारत हा तिसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के तेल आयात करतो. यातील ४० टक्के तेल इराणच्या नियंत्रणाखालील होर्मुझ सामुद्रधुनीतून येते. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे, भारताने एक मोठे पाऊल उचलले असून, रशिया आणि अमेरिकेकडून तेल आयात वाढवली आहे.