पाच महिन्यांत दोन लाख लोकांनी गमावल्या नोकऱ्या; आणखी कपात सुरूच राहणार, रिपोर्टमध्ये दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 08:14 PM2023-05-21T20:14:57+5:302023-05-21T20:24:29+5:30

Laid Off 2023 : मेटा, बीटी, व्होडाफोन आणि इतर अनेक कंपन्यांनी येत्या काही महिन्यांत आणखी कर्मचारी काढण्याची योजना जाहीर केली आहे.

टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी यंदाचे वर्ष म्हणजेच 2023 हे वर्ष मागील 2022 पेक्षा वाईट आहे. 2023 हे वर्ष टेक्नॉलॉजी कर्मचार्‍यांसाठी सर्वात वाईट होते आणि अधिक असू शकते, असे म्हणता येईल.

कारण जागतिक स्तरावर बिग टेक फर्म्सपासून ते स्टार्टअपपर्यंत, गेल्या पाच महिन्यांत सुमारे दोन लाख टेक्नॉलॉजी कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात आले आणि त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. हा ट्रेंड इथेच थांबणार नाही, कारण मेटा, बीटी, व्होडाफोन आणि इतर अनेक कंपन्यांनी येत्या काही महिन्यांत आणखी कर्मचारी काढण्याची योजना जाहीर केली आहे.

ले-ऑफ ट्रॅकिंग साइट Layoffs.fyi च्या आकडेवारीनुसार, या वर्षी आतापर्यंत म्हणजेच जानेवारी ते मे या पाच महिन्यांत 695 टेक कंपन्यांनी जवळपास 1.98 लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. जर याची गेल्या वर्षी म्हणजे 2022 शी तुलना केली तर जानेवारी ते डिसेंबर 2022 या 12 महिन्यांत 1,046 टेक कंपन्यांनी एकूण 1.61 लाखांहून अधिक कर्मचार्‍यांची कपात केली आणि त्यांना काढून टाकले.

केवळ या वर्षी जानेवारीमध्ये, जागतिक स्तरावर सुमारे एक लाख टेक्नॉलॉजी कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या, ज्यामध्ये Amazon, Microsoft, Google, Salesforce आणि इतर कंपन्यातील कर्मचारी सर्वाधिक होते. जानेवारी 2022 आणि या वर्षी मे 2023 पर्यंत एकूण 3.60 लाख टेक्नॉलॉजी कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

मोठमोठ्या टेक कंपन्यांनी कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्याच्या हालचालींमागील विविध कारणे आहेत. ज्यामध्ये ओव्हर हायरिंग, अनिश्चित जागतिक आर्थिक परिस्थिती, कोरोना महामारीनंतरची परिस्थिती आणि बरेच काही आहे.

मेटा (पूर्वीचे फेसबुक) कथितपणे पुढील आठवड्यात नोकर कपातीच्या तिसर्‍या फेरीत अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकण्यास सुरुवात करणार आहे. नेमक्या संख्येची पुष्टी झालेली नसली तरी, कंपनी या फेरीत जवळपास 6,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अॅमेझॉन इंडियाने या महिन्यात आपल्या क्लाउड विभागातील AWS तसेच पीपल एक्सपिरियन्स अँड टेक्नॉलॉजी सोल्युशन्स (PXT) किंवा HR आणि सपोर्ट व्हर्टिकलमधील जवळपास 400-500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. फिनटेक युनिकॉर्न Zepz 420 कर्मचार्‍यांना किंवा 26 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकणार आहे.