मित्राने धोका दिला! 43 वर्षांपूर्वी 3500 शेअर घेतलेले, विसरले; आताची किंमत पाहून कंपनीचीच नियत फिरली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 03:51 PM2021-09-27T15:51:48+5:302021-09-27T16:00:02+5:30

PI Industries Share, babu george valavi dispute: 1978 मध्ये राजस्थानच्या मेवाडमध्ये त्यांनी ऑईल अँड जनरल मिल्स लिमिटेडचे 3500 शेअर्स खरेदी केले होते. तेव्हा ही कंपनी उदयपूरची एक अनलिस्टेड कंपनी होती. या कंपनीत बाबू हे 2.8 टक्के भागीदार झाले. कंपनीचे संस्थापक अध्यक्ष पीपी सिंघल हे बाबू यांचे मित्र होते.

शेअर बाजाराने अनेकांना मालामाल बनविले आहे, तर अनेकांना कंगाल. केरळच्या कोच्ची येथील बाबू जॉर्ज वालावी यांच्या बाबतीच असाच एक किस्सा घडला आहे. त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सची रक्कम पाहून कंपनीचेही इरादे फिरले आणि त्यांना पैसे देण्यास नकार दिला आहे. महत्वाचे म्हणजे वालावी यांनी हे शेअर्स 43 वर्षांपूर्वी खरेदी केले होते परंतू ते विसरले होते. (babu george valavi buys 3500 shares 43 years back; now price is more than 1448 crores.)

बाबू वालिव हे आता 74 वर्षांचे आहेत. त्यांनी हे प्रकरण आता सेबीकडे नेले आहे. ते या शेअर्सचे खरे मालक असून कंपनीने त्यांचे पैसे देण्यास नकार दिल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी सेबीकडून न्याय मिळेल असे म्हटले आहे.

1978 मध्ये राजस्थानच्या मेवाडमध्ये त्यांनी ऑईल अँड जनरल मिल्स लिमिटेडचे 3500 शेअर्स खरेदी केले होते. तेव्हा ही कंपनी उदयपूरची एक अनलिस्टेड कंपनी होती. या कंपनीत बाबू हे 2.8 टक्के भागीदार झाले. कंपनीचे संस्थापक अध्यक्ष पीपी सिंघल हे बाबू यांचे मित्र होते.

कंपनी अनलिस्टेड होती आणि कोणताही डिव्हिडंड देत नव्हती. यामुळे ते पुढे आपण असे कोणते शेअर घेतलेत हे विसरून गेले. 2015 मध्ये त्यांना याची आठवण झाली. या शेअरची किंमत 1440 कोटी रुपये आहे.

माहिती घेतली असता बाबू यांना समजले की, कंपनीचे नाव बदलून आता पीआय इंडस्ट्रीज झाले आहे आणि ही लिस्टेड कंपनी बनली आहे. बाबू यांनी त्यांचे शेअर्स डीमॅट अकाऊंटमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी एका एजन्सीकडे संपर्क साधला.

बाबू यांनी कंपनीशी संपर्क साधला असता त्यांना धक्काच बसला. कंपनीने सांगितले की, तुम्ही आता भागीदार नाहीत आणि तुमचे शेअर्स 1989 मध्ये दुसऱ्याच कोणाला तरी विकण्यात आले. ओरिजिनल शेअर बाबू यांच्याकडेच होते. मग कसे काय विकले, हा प्रश्न उभा राहिला.

बाबू यांचा आरोप आहे की, खरे शेअर माझ्याकडे असताना कंपनीने बनावट शेअर तयार करून ते परस्पर विकले. 2016 मध्ये पीआय कंपनीने मांडवली करण्यासाठी बाबू यांना दिल्लीला बोलविले. बाबू यांनी यास नकार दिला.

यानंतर कंपनीने त्यांचे शेअर खरे आहेत का हे तपासण्यासाठी दोन अधिकारी केरळला पाठविले. त्यांनी हे शेअर खरे असल्याचे मान्य केले. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने बाबू यांनी सेबीकडे याची तक्रार केली आहे.. (Man Bought 3,500 Shares 43 Years Ago & Forgot About It, Now Its Value Is Rs 1448 Crore)