जाणून घ्या इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा फायदा काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 12:34 PM2021-07-17T12:34:24+5:302021-07-17T12:45:14+5:30

पाहा कधीपर्यंत आहे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत आणि काय मिळतो फायदा.

२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत आयटी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत आहे. आर्थिक उत्पन्न प्राप्तिकराच्या कक्षेत येत नसेल तरी आयटी रिटर्न भरणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे अनेक फायदे होतात. काय आहेत हे फायदे, जाणून घेऊ या.

कर परताव्याचा दावातुम्हाला करत परताव्याचा दावा करायचा असेल तर त्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न सादर करणे गरजेचे आहे. इन्कम टॅक्स रिटर्न सादर केल्यानंतर प्राप्तिकर खाते त्याचा आढावा घेते. त्यातून तुम्हाला जर कर परतावा मिळत असेल तर तो थेट तुमच्या बँक खात्यात जमा केला जातो.

तुम्हाला जर परदेशात जायचे असेल तर त्यासाठी व्हिसा असणे आवश्यक असते. व्हिसासाठी अर्ज केला असता तुमच्याकडे इन्कम टॅक्स रिटर्नची फाइल मागितली जाऊ शकते.

अनेक देशांना व्हिसा देण्यासाठी तुमच्याकडून तीन ते पाच वर्षांच्या इन्कम टॅक्स रिटर्नची फाइल सादर करणे बंधनकारक असते. त्यातून तुमचा आर्थिक स्तर काय आहे, हे समजते. त्यानंतर तुम्हाला व्हिसा प्राप्त होतो.

आयटी रिटर्न भरतेवेळी त्याच्याबरोबर फॉर्म १६ ए जोडला जातो. फॉर्म १६ ए तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता तेथून मिळतो. कर्ज घेतेवेळी वा अन्य कारणांसाठी आयटी रिटर्न फाइल उपयुक्त ठरते.

आयटी रिटर्न भरल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्रातून तुमचे वार्षिक उत्पन्न किती, त्यातून किती खर्च होतो याचा पुरावा तुमच्याकडे राहतो.

बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतेवेळी बँक आयटी रिटर्नविषयी विचारणा करते. तुमच्या उत्पन्न किती, स्रोत काय याची माहिती त्यातून मिळते आणि तुम्हाला कर्ज द्यायचे किंवा कसे, याविषयी बँकेला निर्णय घेता येतो. निवासा पत्त्याचा पुरावा म्हणूनही आयटी रिटर्न कामास येते.

तुम्हाला जर स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठीही आयटी रिटर्न भरणे गरजेचे आहे. याशिवाय तुम्हाला जर एखाद्या कंपनीकडून कंत्राट घ्यायचे असेल तर तिथेही आयटी रिटर्न दाखवावे लागते.

कोणत्याही सरकारी खात्याकडून कंत्राट घ्यायचे असेल तर तेथे पाच वर्षांचे आयटी रिटर्न सादर करावे लागते. एकूणच स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठीही आयटी रिटर्न उपयुक्त ठरते.

एक कोटी रुपयांचे विमा सुरक्षा कवच तुम्हाला घ्यायचे असेल तर त्यासाठी विमा कंपनीला आयटी रिटर्न सादर करावे लागते.