Job Change In India: नोकऱ्याच नोकऱ्या! प्रत्येक क्षेत्रातील ५ पैकी ४ जण काम सोडण्याच्या तयारीत; जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 11:35 AM2022-01-18T11:35:32+5:302022-01-18T11:55:50+5:30

Job Change In India: पाहा काय आहे यामागील महत्त्वाचं कारण.

Job Change In India: भारतातील कर्मचारी वर्गासाठी हे वर्ष खूप वेगळं ठरण्याची शक्यता आहे. या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये तब्बल ८२ टक्के लोकांना आपली नोकरी बदलण्याची इच्छा असल्याची माहिती एका सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. ऑनलाइन प्रोफेशनल नेटवर्क लिंक्डइनने (Linkedin) केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की सुमारे ९४ टक्के फ्रेशर्स आणि सुमारे ८७ टक्के प्रोफेशनल्सना यावर्षी नोकरी बदण्याची इच्छा आहे.

भारतातील सुमारे १,१११ कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारे हा सर्वेक्षणाचा निकाल काढण्यात आलाय. टाइम्स ऑफ इंडियाला लिंक्डइनकडून मिळालेल्या या अहवालानुसार या वर्षी ५ पैकी ४ कर्मचाऱ्यांना आपली नोकरी बदलायची असल्याचं दिसून आलं आहे.

लिंक्डइन सर्वेक्षणानुसार, कर्मचाऱ्यांचे नोकरी बदलण्याचे कोणतेही एक कारण नाही. सुमारे ३० टक्के लोकांनी वर्क लाईफ बॅलन्स योग्य नसल्याचं सांगत नोकरी बदलण्याची इच्छा व्यक्त केली. तर दुसरीकडे, २८ टक्के कर्मचाऱ्यांना त्यांना मिळत असलेलं वेतन हे पुरेसं असल्याचं दिसत नाही.

याशिवाय जवळपास २३ टक्के लोकांना त्यांची सध्याची नोकरी सोडून करिअर वाढीसाठी दुसरी नोकरीचा पर्याय स्वीकारायचा आहे. आता २०२२ मध्ये किती कर्मचारी नोकरी बदलतील हे पाहावं लागणार आहे.

लिंक्डइन न्यूजचे भारताचे व्यवस्थापकीय संपादक अंकित वेंगुर्लेकर म्हणाले की, लोक तीन गोष्टी लक्षात ठेवतात. पहिली गोष्ट म्हणजे लवचिक कार्यप्रणाली, जी २९ टक्के लोक लक्षात ठेवत आहेत. तर दुसरीकडे सुमारे २७ टक्के लोक नोकरीमध्ये सस्टेनेबिलिटी शोधत आहेत. याशिवाय २७ टक्के लोक करिअरच्या ग्रोथचा विचार करत आहेत.

"सुमारे ४५ टक्के लोकांना त्यांच्या नोकरीबद्दल पूर्ण विश्वास आहे, ४५ टक्के लोकांना त्यांच्या करिअरबद्दल पूर्ण विश्वास आहे आणि सुमारे ३८ टक्के लोकांना नोकरीच्या उपलब्धतेबद्दल पूर्ण विश्वास आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

७१ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार कोरोना महासाथीच्या पूर्वीच्या तुनलनेत आता त्यांच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यामुळेच त्यांचा आता नोकरी बदलण्याचा विचार आहे. तर ६३ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांना आपल्या नोकरीमुळे imposter syndrome समस्या निर्माण झाली आहे. तर ३० टक्के प्रोफेशनल्सनुसार कोरोना महासाथीमुळे त्यांच्या आत्मविश्वासावर वाईट परिणाम झाला आहे.

४० टक्के लोक आपल्या सहकाऱ्यांचं आणि टीम लीडर्सचं सहकार्य न मिळण्यामुळे चिंताग्रस्त आहेत, तर ३४ टक्के लोक नवी जबाबदारी सध्या स्वीकारण्याच्या मनस्थितीत नाहीत. याशिवाय ३१ टक्के लोक तंत्रज्ञानासोबत मिसळू शकत नसल्याचंही समोर आलं आहे.

सर्वेक्षणानुसार, पुरुषांपेक्षा महिला कर्मचारी अयोग्य वर्क लाईफ बॅलन्समुळे चिंतेत आहेत. ५ पैकी २ महिला म्हणजे सुमारे ४३ टक्के महिला कर्मचारी नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत. वर्क लाईफ बॅलन्स चांगला मिळावा हा त्यांचा मुख्य हेतू आहे. त्याच वेळी, ३० टक्के महिला कर्मचारी या अधिक पगाराच्या नोकरीसाठी सध्याची नोकरी बदलण्याच्या विचारात आहेत.

सुमारे ४९ टक्के महिलांचा असा विश्वास आहे की त्यांना आतापेक्षा जास्त वेतन मिळाले तर त्या नोकरी बदलणार नाहीत. त्याच वेळी, वेतन वाढल्यास केवळ ३९ टक्के पुरुष त्यांच्या सध्याच्या नोकरीवर राहण्यास तयार आहेत.