IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:43 IST2025-12-17T12:01:14+5:302025-12-17T12:43:35+5:30
IPL Auction Tax On Salary, Tax on IPL Fee: मंगळवारी अबू धाबीमध्ये आयपीएल २०२६ साठी मिनी ऑक्शन पार पडलं. यावेळी खेळाडूंवर कोट्यवधींच्या बोली लावल्या गेल्या. मात्र, ही एवढी मोठी रक्कम ग्रीनला पूर्णपणे मिळते का? खेळाडूंना बोलीची ही रक्कम 'इन-हैंड' सॅलरी म्हणून मिळते का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ.

IPL Auction Tax On Salary: मंगळवारी अबू धाबीमध्ये आयपीएल २०२६ साठी मिनी ऑक्शन पार पडलं. यावेळी खेळाडूंवर कोट्यवधींच्या बोली लावल्या गेल्या. ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमेरून ग्रीनने तर २५.२० कोटी रुपयांची बोली मिळवून इतिहास रचला आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) खरेदी केलं.

मात्र, ही एवढी मोठी रक्कम ग्रीनला पूर्णपणे मिळते का? खेळाडूंना बोलीची ही रक्कम 'इन-हैंड' सॅलरी म्हणून मिळते का? तर याचं उत्तर 'नाही' असं आहे. ही रक्कम खेळाडूची ग्रॉस सॅलरी असते, ज्यामधून टॅक्स आणि इतर कपात केली जाते. या बातमीतून आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की ऑक्शनमधील किमतीचा नक्की अर्थ काय आणि खेळाडूंना प्रत्यक्षात किती पैसे मिळतात.

ऑक्शन प्राईस म्हणजे काय? आयपीएल लिलावात ज्या रकमेवर खेळाडूला खरेदी केले जाते, ती त्या हंगामासाठी फ्रँचायझीकडून मिळणारा पगार असतो. हा करार संपूर्ण हंगामासाठी असतो. खेळाडूनं प्रत्येक सामना खेळला किंवा तो संपूर्ण वेळ बेंचवर बसून राहिला, तरी त्याला करारानुसार पूर्ण पगार मिळतो, जोपर्यंत करारात कोणतीही विशेष अट नसेल. फ्रँचायझी ही रक्कम सहसा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी किंवा दरम्यान काही हप्त्यांमध्ये खेळाडूंना देते.

खेळाडूंना 'इन-हैंड' किती रक्कम मिळते? खेळाडूला लिलावातील पूर्ण रक्कम थेट मिळत नाही. भारताच्या कर नियमांनुसार, ही रक्कम खेळाडूचं वार्षिक उत्पन्न मानली जाते आणि त्यावर 'इन्कम टॅक्स' आकारला जातो. उच्च वेतन श्रेणीतील खेळाडूंसाठी टॅक्सचे दर खूप जास्त असतात. याव्यतिरिक्त, अनेक खेळाडू आपले मॅनेजर्स ठेवतात, ज्यांची फी देखील याच रकमेतून द्यावी लागते. काही खेळाडू त्यांच्या वैयक्तिक स्टाफवरही खर्च करतात.

उदाहरणादाखल, जर एखाद्या खेळाडूची ऑक्शन प्राईस २ कोटी रुपये असेल, तर ती त्याची ग्रॉस सॅलरी आहे. टॅक्स (३०% किंवा त्याहून अधिक) आणि इतर खर्च वजा केल्यानंतर, खेळाडूच्या हातात साधारणपणे १.३ कोटी ते १.४ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम येते.

भारतीय खेळाडूंना नियम कसा लागू होईल? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मॅच फी किंवा आयपीएल लिलावाच्या रकमेवर १०% टीडीएस कापण्याचा नियम फक्त भारतीय खेळाडूंनाच लागू होतो. आयकर कायद्याच्या कलम १९४जे अंतर्गत त्यांच्या कमाईवर १०% टीडीएस आधीच कापला जातो. परंतु, अंतिम कर खेळाडूच्या वार्षिक उत्पन्नावर आणि त्यांच्या स्लॅबवर आधारित मोजला जातो. या उत्पन्नात आयपीएल फी आणि जाहिरातींचं उत्पन्न देखील समाविष्ट आहे.

दुखापत किंवा रिटेंशन झाल्यास नियम काय? जर एखादा खेळाडू दुखापत किंवा इतर कारणांमुळे संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही, तर त्याचे पेमेंट करारातील अटींवर अवलंबून असते. अनेकदा त्यांना पूर्ण रक्कम मिळते, तर काही वेळा ती कमीही होऊ शकते. जेव्हा एखाद्या खेळाडूला लिलावात न पाठवता 'रिटेन' केलं जातं, तेव्हा फ्रँचायझी आणि खेळाडू मिळून पगार ठरवतात. ही रक्कम देखील पगारच मानली जाते आणि त्यावरही वरीलप्रमाणे टॅक्सचे नियम लागू होतात.

पगाराव्यतिरिक्त इतर कमाई कशी होते? लिलावातील पगार हे केवळ मूळ उत्पन्न असतं. याशिवाय खेळाडू प्राइज मनी, मॅन ऑफ द मॅच आणि ब्रँड एंडोर्समेंट (जाहिराती) यांसारख्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर पैसे कमावतात.

















