Inflation : कधीपर्यंत सामान्यांना महागाईतून दिलासा मिळणार? रिझर्व्ह बँकेच्या समिती सदस्यानं दिलं हे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 09:55 AM2023-03-13T09:55:46+5:302023-03-13T10:02:59+5:30

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या सदस्या आशिमा गोयल यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं.

या वर्षी महागाई कमी होण्याची अपेक्षा असल्याचं मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) सदस्य आशिमा गोयल यांनी व्यक्त केलं. भारतानं गेल्या तीन वर्षांत उत्तम लवचिकता दाखवून आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला आहे. वर्षभरात महागाई दर कमी होण्याची अपेक्षा आहे, असं गोयल यांनी नमूद केलं.

महागाईबाबतच्या लवचिक व्यवस्थेसोबतच पुरवठ्यामुळे दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारतात महागाई दर कमी राहिला आहे, असं गोयल यांनी नमूद केलं.

भारतात महागाई ही सामान्य स्थिती झाली आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. महासाथीच्या काळात धोरणात्मक दरांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली होती, त्यामुळंच आता ते झपाट्यानं वाढवावे लागले, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

परंतु बाहेरून येणारी मागणी कमी असल्यानं सध्याच्या धोरणात्मक दरांमध्ये अधिक वाढ होऊ नये. देशांतर्गत मागणीची भरपाई करण्यास परवानगी दिली पाहिजे, असं गोयल यांनी नमूद केलं रिझर्व्ह बँकेनं मे महिन्यापासून रेपो दरात २.५ टक्क्यांची वाढ केली आहे.

RBI ने चालू आर्थिक वर्षासाठी ग्राहक किंमतींवर आधारित महागाई दराचा अंदाज ६.७ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. भारताचा किरकोळ महागाई दर जानेवारीमध्ये ६.५२ टक्के होता.

उष्ण हवामानाचा गव्हाच्या पिकावर आणि अन्नधान्य महागाईवर काय परिणाम होऊ शकतो, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, हवामान अनिश्चित झाले आहे, त्यामुळे शेतीमध्ये लवचिकता आणणे आवश्यक आहे. त्या दिशेने काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. भू-राजकीय आव्हानांमुळे धोके कायम असल्याचंही त्यांनी सांगितलं.