Corona Vaccine: लस घ्या आणि १० टक्के सूट मिळवा; ‘या’ विमान कंपनीची भन्नाट ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 04:05 PM2021-06-23T16:05:45+5:302021-06-23T16:09:30+5:30

Corona Vaccine: लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी एका विमान कंपनीने तिकिटावर सवलत जाहीर केली आहे. पाहा, डिटेल्स...

देशात कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरताना दिसत आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून वारंवार दिला जात आहे. यासंदर्भात सरकारने आतापासून तयारी करायला सुरुवात केली आहे.

कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी एका विमान कंपनीने तिकिटावर सवलत जाहीर केली आहे.

देशात आघाडीची विमान कंपनी असलेल्या इंडिगोने प्रवाशांकरिता विशेष सवलत आणली आहे. लशीचा किमान एक डोस घेतला असल्यास प्रवाशाला तिकिटावर १० टक्के सवलत मिळणार आहे.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही सवलत योजना मर्यादित काळासाठी आहे. ज्या प्रवाशांनी किमान एक तरी डोस घेतला असेल अशा प्रवाशाला तिकिटावर १० टक्के सवलत मिळेल.

ही सवलत घेण्यासाठी प्रवाशाला विमानतळावरील कंपनीच्या काउंटरवर किंवा बोर्डिंग गेटवर लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

याशिवाय, प्रवाशांना आरोग्य सेतू ऍपवर देखील लस घेतल्याचा स्टेट्स दाखवता येईल. देशातील मोठी विमान कंपनी म्हणून आम्हाला जबाबदारीची जाणीव आहे.

राष्ट्रीय पातळीवरील लसीकरण मोहीमेला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने तिकीट दरावर सवलत देऊन प्रयत्न केला आहे, असे इंडिगोचे मुख्य महसूल अधिकारी संजय कुमार यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात ५० हजार ८४८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

देशाचा रिकव्हरी रेट वाढून ९६.५६ टक्क्यांवर पोहोचला आहे.. दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट थोडा वाढून २.६७ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १३५८ जणांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी ६८ हजार ८१७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. देशात सध्या ६ लाख ४३ हजार १९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Read in English