मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:36 IST2025-08-05T11:28:23+5:302025-08-05T11:36:03+5:30
Investment Tips : एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण, देशातील सर्वात श्रीमंत लोक म्युच्युअल फंड नाही तर वेगळ्याच साधनांमध्ये आपला पैसा गुंतवत आहेत.

गेल्या काही वर्षात शेअर बाजार आणि एसआयपीमार्फत म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याकडे मध्यमवर्गीयांचा कल वाढला आहे. पण, देशातील १ टक्के सर्वाधिक श्रीमंत लोक गुंतवणुकीसाठी वेगळी साधने वापरत असल्याचे समोर आले आहे.
अमेरिकन फंड मॅनेजमेंट फर्म बर्नस्टाईनने भारतीय श्रीमंतांवर एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, देशातील सर्वात श्रीमंत १ टक्के लोकांनी त्यांच्या एकूण संपत्तीपैकी ६० टक्के रक्कम रिअल इस्टेट आणि सोन्यामध्ये गुंतवली आहे. हा अहवाल भारतीय अर्थव्यवस्थेतील संपत्तीच्या असमानतेवर आणि श्रीमंतांच्या गुंतवणुकीच्या पद्धतीवर प्रकाश टाकतो.
बर्नस्टाईनच्या अहवालात 'सर्वात श्रीमंत नागरिक' या श्रेणीमध्ये अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स, हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स आणि श्रीमंत वर्ग यांचा समावेश आहे.
हा वर्ग भारतीय कुटुंबांच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त १ टक्के आहे, पण देशाच्या एकूण संपत्तीपैकी तब्बल ६० टक्के संपत्ती त्यांच्याकडे आहे.
देशातील वरच्या १ टक्के लोकांकडे एकूण उत्पन्नाच्या ४० टक्के हिस्सा आहे. 'उर्वरित भारतात' राहणाऱ्या लोकांकडे उत्पन्न आणि संपत्तीचा फक्त एक छोटासा भाग आहे. भारतात सुमारे ३५,००० अशी कुटुंबे आहेत, ज्यांची एकूण संपत्ती १२ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १०० कोटी) पेक्षा जास्त आहे. या श्रीमंत कुटुंबांची सरासरी संपत्ती ५४ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४७२.५ कोटी) आहे.
अहवालानुसार, श्रीमंत वर्गाकडे असलेल्या एकूण ११.६ ट्रिलियन डॉलर्सपैकी बहुतांश गुंतवणूक सोने, रोख रक्कम, प्रमोटर इक्विटी आणि रिअल इस्टेटमध्ये आहे. याचा अर्थ, केवळ २.७ ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक म्युच्युअल फंड, इक्विटी आणि विमा यांसारख्या सेवायोग्य आर्थिक मालमत्तेत केली जाते.
सोने आणि रिअल इस्टेटच्या पलीकडे आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी भारतीय श्रीमंत आता नवीन मार्ग शोधत आहेत. यामुळे, पुढील १० वर्षांत मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना मोठी संधी मिळेल असे अहवालात म्हटले आहे. यातून असे दिसते की, भारतीय गुंतवणूकदारांमध्ये पारंपरिक गुंतवणुकीच्या पद्धती हळूहळू बदलत आहेत.