Oxygen Express: मिशन ऑक्सिजन! आतापर्यंत १३९ रेल्वेतून तब्बल ८,७०० मेट्रिक टन ऑक्सिजन वाहतूक

Published: May 16, 2021 06:50 PM2021-05-16T18:50:06+5:302021-05-16T18:54:11+5:30

Oxygen Express: भारतीय रेल्वेने (indian railways) देशभरातील अनेक राज्यांना आतापर्यंत जवळपास ८,७०० मेट्रिक टन द्रवरुप प्राणवायू ५४० पेक्षा जास्त टँकर्समधून वितरीत केला आहे.

मुंबई गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. (Oxygen Express)

कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे. ऑक्सिजनअभावी शेकडो रुग्णांचा मृत्यू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्सिजन तुटवड्यावर उपाय तसेच ऑक्सिजनची वाहतूक वेगाने करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) पुढाकार घेण्यात आला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरातील विविध राज्यांमध्ये द्रवरूप प्राणवायूच्या पुरवठ्याची मदत पोहोचवण्याचे काम अद्यापही भारतीय रेल्वे करत आहे. भारतीय रेल्वेने देशभरातील अनेक राज्यांना आतापर्यंत जवळपास ८,७०० मेट्रिक टन द्रवरुप प्राणवायू ५४० पेक्षा जास्त टँकर्समधून वितरीत केला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत १३९ ऑक्सिजन एक्स्प्रेसनी विविध राज्यांना ऑक्सिजनची जलदगतीने वाहतूक केली आहे. शनिवारी ३५ टँकर्समधून ४७५ मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायू घेऊन विविध ठिकाणांहून ६ ऑक्सिजन एक्स्प्रेस वाहतूक करत आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये दर दिवशी ऑक्सिजन एक्स्प्रेस देशाला जवळपास ८०० मेट्रिक टन प्राणवायूची वाहतूक केली आहे. आंध्र प्रदेशासाठी पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस नेल्लोर येथे ४० मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायू घेऊन पोहोचली आहे.

अजून एक ऑक्सिजन एक्स्प्रेस केरळच्या दिशेने त्या भागासाठी ११८ मेट्रीक टन द्रवरूप प्राणवायू घेऊन प्रवास करत आहे.

१५ मे पर्यंत महाराष्ट्रात ५२१ मेट्रिक टन, उत्तर प्रदेशात जवळपास २३५० मेट्रिक टन, मध्य प्रदेशात ४३० मेट्रिक टन, हरियाणात १२२८ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

तर, तेलंगणात ३०८ मेट्रिक टन, राजस्थानात ४० मेट्रिक टन, कर्नाटकात ३६१ मेट्रिक टन, उत्तराखंडात २०० मेट्रिक टन, तामिळनाडूत १११ मेट्रिक टन, आंध्र प्रदेशात ४० मेट्रिक टन तर दिल्लीत ३०८४ मेट्रिक टनाहून अधिक प्राणवायू उतरवण्यात आला आहे.

ऑक्सिजन पुरवठ्यामुळे भारतीय रेल्वे खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी ठरल्याचे सांगितले जात आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी वेळोवेळी ट्विट करत या ऑक्सिजन एक्स्प्रेसबाबत माहिती दिली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!