आता भारतीय रेल्वे जेवणाचा मेनू बदलणार; IRCTC ने आणली नवीन सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 01:27 PM2022-11-16T13:27:05+5:302022-11-16T13:47:05+5:30

IRCTC : या नवीन जेवण मेनूअंतर्गत प्रवाशांना त्यांच्या आवडीनुसार प्रादेशिक आणि हंगामी खाद्यपदार्थ दिले जातील.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा देत आहे. आता रेल्वे लोकांना जेवणाच्या मेन्यूबाबत एक नवी सुविधा देत आहे. याअंतर्गत मधुमेही रुग्ण, लहान मुले आणि आपल्या भागातील खाद्यप्रेमींना त्यांच्या गरजेनुसार आहार दिला जाणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनला (IRCTC) ट्रेन्ससाठी जेवणाचा मेनू बदलण्याची सवलत दिली आहे. या नवीन जेवण मेनूअंतर्गत प्रवाशांना त्यांच्या आवडीनुसार प्रादेशिक आणि हंगामी खाद्यपदार्थ दिले जातील.

या जेवणाचे चार्ज तुमच्या तिकिटात समाविष्ट केले जाणार नाही, परंतु जेवण आधीच तिकिटात समाविष्ट केले असल्यास, मेनू आयआरसीटीसी ठरवेल, प्रवासी नाही. प्रीपेड ट्रेन्स, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमधील जेवणाचा मेनू निश्चित बजेटनुसार दिला जाईल.

या नवीन मेनूमध्ये प्रादेशिक खाद्यपदार्थ आणि आवडीचे पदार्थ, हंगामी पदार्थ, सण-उत्सवांदरम्यानच्या गरजा, तसेच डायबिटीज फूड, बेबी फूड आणि हेल्थ फूड पर्यायांसह समुहांसाठी जेवणाचा समावेश असणार आहे. मंत्रालयाने सांगितले की, प्रीपेड ट्रेन्समधील मेनू आयआरसीटीसीने आधीच अधिसूचित केलेल्या टॅरिफमध्ये निश्चित केला जाईल.

मंत्रालयाने सांगितले की, प्रीपेड ट्रेन्समधील मेनू आयआरसीटीसीने आधीच ठरवलेल्या बजेटमध्ये दिला जाईल. याशिवाय या ट्रेनमध्ये ए-ला-कार्टे खाद्यपदार्थ आणि ब्रँडेड खाद्यपदार्थांना एमआरपीवर परवानगी दिली जाईल. अ-ला-कार्टे फूडचा मेनू आणि दर आयआरसीटीसीद्वारे ठरवले जातील.

बजेट सेगमेंट ट्रेन्सचा मेनू आयआरसीटीसीद्वारे पूर्व-निर्धारित दरामध्ये दिला जाईल. मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये एमआरपीवर अ-ला-कार्टे जेवण आणि ब्रँडेड खाद्यपदार्थ विक्रीस परवानगी असेल. मेनू आणि दर आयआरसीटीसीद्वारे ठरवले जातील. जनता जेवणाचे दर आणि मेनूमध्ये कोणताही बदल होणार नाही.

जेवणाच्या गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. यासोबतच यामध्ये कोणतेही खराब उत्पादन वापरले जाणार नाही याचीही काळजी घेतली जाईल.