तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:04 IST2025-08-25T15:59:38+5:302025-08-25T16:04:51+5:30

भारताने स्वस्त दरात रशियन तेल खरेदी केले अन् शुद्ध करुन युरोप-अमेरिकेसह संपूर्ण जगाला विकले.

India-Russia Crude Oil : येत्या दोन दिवसांत, म्हणजेच २७ ऑगस्टपासून भारतावर अमेरिकेचा २५ टक्के अतिरिक्त कर लागू केला जाईल. रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्यामुळे हा कर लादण्यात आला आहे. यासह भारतावर अमेरिकेचा एकूण ५० टक्के कर असेल. अमेरिका आणि युरोपियन युनियनचे म्हणणे आहे की, भारत रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी करतो आणि जास्त किमतीत इतर देशांना विकतो. यामुळे रशियाला युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू ठेवण्यास मदत होते.

रशियन तेल भारतासाठी महत्वाचे- दरम्यान, अमेरिकेचा दावा काही प्रमाणात योग्य आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करायला सुरुवात केली, तेव्हा भारताच्या तेलाच्या टोपलीत रशियन तेलाचा वाटा २ टक्केही नव्हता. तो कोव्हिडचा काळ होता. जागतिक अर्थव्यवस्था संकटातून जात होती. भारताची निर्यात बरीच कमी झाली होती. कमाईचे मार्ग खूप मर्यादित झाले होते. अशा परिस्थितीत, रशियन तेलाने भारताच्या अर्थव्यवस्थेला आधार दिला. भारताने स्वस्त दरात रशियन तेल खरेदी केले, ते शुद्ध केले आणि युरोप-अमेरिकेसह उर्वरित जगात निर्यात सुरू केली. २०२४ च्या आर्थिक वर्षात भारताच्या रिफाइंड तेल निर्यातीने ८० अब्ज डॉलर्स ओलांडले. अशा परिस्थितीत, तुम्ही अंदाज लावू शकता की, भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रशियन तेलाचे योगदान किती महत्त्वाचे आहे.

रशियाचा सर्वाधिक वाटा- भारत जगाला रिफाइंड तेल निर्यात करण्यापूर्वी कच्चे तेल आयात करतो. सध्या, भारतासाठी कच्चे तेल पुरवठादारांची संख्या ५० पेक्षा जास्त आहे. यामध्ये भारताचा सर्वात मोठा पुरवठादार दुसरा तिसरा कोणी नसून रशिया आहे. भारतीय तेलाच्या साठ्यात रशियन तेलाचा वाटा ४० टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. केप्लरच्या अहवालानुसार, ऑगस्ट महिन्यात भारताने दररोज २० लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले आहे. तेही अशा वेळी, जेव्हा अमेरिकेने भारतावर २५ टक्के अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली आहे.

कुणाकडून किती तेल आयात?- या वाढीचे मुख्य कारण म्हणजे, इराक आणि सौदी अरेबियामधून आयातीत झालेली घट. अहवालानुसार, भारत दररोज ५.२ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात करतो. ज्यामध्ये ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात रशियाचा वाटा ३८ टक्के होता. इराकमधून भारताला होणारा पुरवठा कमी झाला आहे. जुलैमध्ये हा आकडा दररोज ९०७,००० बॅरल होता, जो ऑगस्टमध्ये ७३०,००० बॅरल प्रतिदिन झाला. दुसरीकडे, सौदी अरेबियाचा पुरवठा जुलैमध्ये ७००,००० बॅरल प्रतिदिन होता, जो ऑगस्टमध्ये ५२६,००० बॅरल प्रतिदिन झाला. तर, भारतात अमेरिकेतून दररोज २६४,००० बॅरल कच्चे तेल आयात केले. हा पाचवा सर्वात मोठा पुरवठादार आहे.

रिफाइंड तेलापासून किती उत्पन्न मिळते?- भारताने आता जगाला रिफाइंड कच्चे तेल विकण्यास सुरुवात केली असून, यातून अब्जावधी डॉलर्स कमावले आहेत. यामुळेच अमेरिका आणि युरोपच्या पोटात दुखत आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताने जगाला रिफाइंड तेल विकून ६०.०७ अब्ज डॉलर्स, म्हणजेच ५.२५ लाख कोटी रुपये कमावले आहेत. ही कमाई २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीपेक्षा खूपच कमी आहे. आकडेवारीनुसार, या आर्थिक वर्षात भारताने रिफाइंड पेट्रोलियम उत्पादने विकून ८४.२ अब्ज डॉलर्स, म्हणजेच ७.३७ लाख कोटी रुपये कमावले. यामागील मुख्य कारण म्हणजे या काळात जागतिक पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत झालेली घसरण.

कोणत्या पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्रीतून भारताने किती कमाई केली?- डॉलर बिझनेसच्या अहवालानुसार, भारताने अनेक पेट्रोलियम उत्पादने शुद्ध करुन जगाला विकली आहेत. ज्यामध्ये हाय-स्पीड डिझेल अव्वल स्थानावर आहे. आकडेवारीनुसार, २०२५ च्या आर्थिक वर्षात, भारताने यातून १७.३८ अब्ज डॉलर्सची कमाई केली. त्यानंतर, मोटर स्पिरीट म्हणजेच पेट्रोलच्या विक्रीतून $८.१३ अब्ज डॉलर्स, एव्हिएशन टर्बाइनच्या विक्रीतून $५.३३ अब्ज डॉलर्स, इंधन तेलाच्या विक्रीतून १.३८ अब्ज डॉलर्स, नाफ्था विकून १९६.२९ मिलियन डॉलर्स, लिक्विड पेट्रोलियम वायू म्हणजेच एलपीजी विकून ३७.५१ मिलियन डॉलर्स आणि केरोसीनच्या विक्रीतून २ मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे.