Income Tax Saving Tips : करदात्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स! कर वाचवण्यासाठी 31 मार्चपूर्वी करा 'या' 5 गोष्टी...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 10:36 AM2023-03-14T10:36:42+5:302023-03-14T10:48:35+5:30

Income Tax Saving Tips : वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही पैसे वाचवू शकता. कर वाचवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? ते जाणून घ्या...

पुढील आर्थिक वर्षातील गुंतवणुकीचे नियोजन करदात्यांकडून सुरू झाले आहे. चालू आर्थिक वर्ष 31 मार्च 2023 रोजी संपत आहे. तुम्हीही कर वाचवण्यासाठी 31 मार्च 2023 पूर्वी काही पावले उचलून तुमचा कर वाचवू शकता. वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही पैसे वाचवू शकता. कर वाचवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? ते जाणून घ्या...

सर्वात आधी तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या बचतीसाठी दावा करू शकता. या अंतर्गत तुम्ही पीपीएफ, ईएलएसएस, ईपीएफ, टॅक्स सेव्हिंग एफडी आणि इतर गोष्टींमध्ये गुंतवणूक करून कर वाचवू शकता.

याशिवाय, तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मध्ये गुंतवणूक करून कर वाचवू शकता. गुंतवणूक करण्याचा हा एक स्मार्ट मार्ग आहे. करदाते कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा 50,000 रुपयांच्या अतिरिक्त कपातीचा क्लेम करू शकतात.

करदाते आपल्या जोडीदारासाठी आणि मुलांसाठी आरोग्य विम्याच्या प्रीमियममध्ये 25,000 रुपयांपर्यंतच्या कपातीचा क्लेम करू शकतात. याशिवाय, करदाता आपल्या पालकांसाठी आरोग्य विम्याच्या स्वरूपात 25,000 रुपयांच्या अतिरिक्त कपातीचा दावा करू शकतो. तुमचे पालक ज्येष्ठ नागरिक असल्यास, तुम्ही त्यांच्या वैद्यकीय विम्यासाठी 50,000 रुपयांचा दावा करू शकता.

जर करदात्याने इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले असेल किंवा भविष्यात ते खरेदी करण्याची योजना असेल, तर तुम्ही कर्जावर भरलेल्या व्याजावर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करू शकता. यामुळे कराचीही मोठी बचत होईल.

आयकराची रक्कम कमी करण्यासाठी गृहकर्जावर मिळणाऱ्या कर सवलतीचा लाभ करदाते घेऊ शकतात. यात मूळ रक्कम आणि व्याज देय दोन्ही समाविष्ट आहे. तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपये आणि कलम 24B अंतर्गत 2 लाख रुपयांची सूट मिळू शकते.

करदात्यांनी आपला कर आगाऊ भरण्याचाही विचार करावा. करदात्याने देय असलेला एकूण कर 10,000 पेक्षा जास्त असल्यास, भविष्यात व्याज टाळण्यासाठी तो आगाऊ कर भरू शकतो.