Income Tax : आयटीआरमधील हुशारी पडू शकते महागात, १ लाख लोकांना आलीये नोटीस; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 09:24 AM2023-07-25T09:24:39+5:302023-07-25T09:34:57+5:30

आयटीआर (ITR) भरण्याची अंतिम मुदत आता जवळ येत आहे. ३१ जुलै ही आयटीआर भरण्याची अंतिम तारीख आहे.

आयटीआर (ITR) भरण्याची अंतिम मुदत आता जवळ येत आहे. ३१ जुलै ही आयटीआर भरण्याची अंतिम तारीख आहे. आयटीआरमध्ये कर वाचवण्यासाठी कोणतीही हुशारी तुम्हाला भारी पडू शकते. सुमारे एक लाख करदात्यांना नोटिसा पाठवण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्यांच्या रिटर्नमध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

यापैकी बहुतेक प्रकरणांमध्ये, करदात्यांनी त्यांचं उत्पन्न लपवलं आहे किंवा कमी उत्पन्न जाहीर केलंय. हे रिटर्न चार ते सहा वर्षे जुने आहेत आणि आयकर विभाग ३१ मार्च २०२४ पर्यंत ही सर्व प्रकरणं निकाली काढेल. करदात्यांना कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळणं आता सोपं राहिलेलं नाही.

याचं कारण महसूल विभाग आयटीआर तपासण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे. तसंच, करदात्यांच्या क्लेमची पडताळणी करण्यासाठी त्याचं ३६०-डिग्री प्रोफाइलिंग केलं जात आहे. डेटा मायनिंग आणि अॅनालिटिक्सचीही मदत घेतली जात आहे.

लाख करदात्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी आयकर दिनानिमित्त बोलताना दिली. या लोकांनी आयटीआरमध्ये कमी उत्पन्न दाखवलं किंवा त्याचा खुलासा केलेला नाही. विनाकारण त्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या नाहीत.

आयकर विभाग सर्व प्रकरणे पारदर्शक पद्धतीनं आणि जबाबदारीनं हाताळेल. तंत्रज्ञानाच्या मदतीनं करदात्यांचं काम सोपं झालं असून ते त्वरित कर भरत असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकांना त्यांच्या उत्पन्नाच्या सर्व स्रोतांची माहिती मिळत आहे. यामुळे कर विवाद कमी होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

गेल्या १४ महिन्यांत सुमारे एक लाख करदात्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यापैकी बहुतेक लोकांचं वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचं आयकर विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. आयकर कायद्यांतर्गत अधिकारी सहा वर्षांपेक्षा जुनी प्रकरणे पुन्हा उघडू शकतात.

सीबीडीटीनं मे २०२३ मध्ये ५५ हजार नोटिसांचे स्कूटनी असेसमेंट पूर्ण केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. आता लोकांना व्यवस्थेची फसवणूक करता येणार नाही. यावर आमची भूमिका स्पष्ट आहे, असं सीतारामन म्हणाल्या.