घरी कॅश ठेवत असाल तर जाणून घ्या नियम, अन्यथा इन्कम टॅक्स विभाग घेऊ शकतो ॲक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 08:34 AM2024-01-12T08:34:26+5:302024-01-12T08:56:20+5:30

Cash Rules: सध्या डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होत असली तरी अनेक व्यवहारांसाठी आजही कॅश वापरली जाते.

Cash Rules: कोरोनाच्या काळापासून डिजिटल व्यवहारांमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. आता मोठ्या प्रमाणात लोक डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देत आहेत. मात्र त्यानंतरही अनेक प्रकारचे व्यवहार रोखीनेच होत आहेत. त्याच वेळी, जे लोक इंटरनेट फ्रेंडली नाहीत ते देखील त्यांची सर्व कामं ऑनलाइन व्यवहारांऐवजी रोखीनं पूर्ण करण्यास प्राधान्य देतात.

यामुळेच लोक आजही घरात कॅश ठेवण्याला प्राधान्य देतात. पण करचोरी आणि काळा पैसा यासारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं रोख रकमेबाबत अनेक नियम केले आहेत. अशा परिस्थितीत एक प्रश्न अनेकवेळा मनात येतो, पण आपण त्यावर चर्चा करत नाही आणि तो म्हणजे घरात किती कॅश ठेवता येईल? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊ.

आयकर नियमांनुसार घरात रोख रक्कम ठेवण्याबाबत कोणताही विशेष नियम किंवा मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तर तुम्ही कितीही रक्कम घरात ठेवू शकता. परंतु तुमच्याकडे त्या रकमेचा स्रोत असणं आवश्यक आहे.

तपास यंत्रणेकडून कधी तुमची चौकशी झाली तर तुम्हाला तो स्रोत दाखवावा लागेल. याशिवाय आयटीआर डिक्लेरेशनही दाखवावं लागेल. याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही चुकीच्या मार्गानं पैसे कमावले नसतील, तर तुम्ही घरात कितीही रोकड ठेवली तरी काळजी करण्याची गरज नाही.

जर तुम्ही तपास यंत्रणेला पैशाचा स्रोत सांगू शकत नसाल तर तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत तपास यंत्रणेला या प्रकरणाची माहिती दिली जाते. त्यानंतर आयकर विभाग, तुम्ही किती कर भरला आहे याची तपासणी करतो. दरम्यान, जर हिशोबात अघोषित कॅश आढळली, तर आयकर विभागाकडून तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, तुमच्याकडून अघोषित रकमेच्या १३७ टक्क्यांपर्यंत कर आकारला जाऊ शकतो.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या म्हणण्यानुसार, तुम्ही एकावेळी ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास तुम्हाला तुमचे पॅन कार्ड दाखवावं लागेल. आयकर कायद्याच्या कलम 194N अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीनं एका आर्थिक वर्षात 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढली तर त्याला टीडीएस भरावा लागतो. दरम्यान, हा नियम फक्त अशा लोकांसाठी आहे ज्यांनी सलग ३ वर्षे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नाही.

आयटीआर भरलेल्या लोकांना या प्रकरणात थोडा दिलासा मिळतो. अशा लोकांना टीडीएस न भरता बँक, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी बँक खात्यातून आर्थिक वर्षात १ कोटी रुपयांपर्यंतची रोकड काढता येते. या परिस्थितीत बँकेतून वर्षभरात १ कोटींहून अधिक रक्कम काढल्यास २ टक्के टीडीएस भरावा लागेल. जर तुम्ही गेल्या तीन वर्षांपासून आयटीआर भरला नसेल तर तुम्हाला २० लाख रुपयांच्या व्यवहारांवर २ टक्के आणि १ कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर ५ टीडीएस भरावा लागेल.

क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे एका वेळी १ लाख रुपयांच्या वरचे व्यवहार केल्यास त्याचा तपास केला जाऊ शकतो. याशिवाय काहीही खरेदी करण्यासाठी तुम्ही २ लाख रुपयांपेक्षा जास्त रोख देऊ शकत नाही. तुम्हाला हे करायचे असल्यास, तुम्हाला येथे पॅन आणि आधार देखील दाखवावा लागेल.