Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

By जयदीप दाभोळकर | Updated: August 12, 2025 08:55 IST2025-08-12T08:46:27+5:302025-08-12T08:55:04+5:30

Post Office Savings Scheme: पोस्ट ऑफिस देशातील सामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध बचत योजना चालवतं. पाहूया एमआयएस स्कीममध्ये एकूण किती व्याज मिळतं.

Post Office Savings Scheme: पोस्ट ऑफिस देशातील सामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध बचत योजना चालवतं. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी, टीडी, एमआयएस, पीपीएफ, किसान विकास पत्र यासह अनेक प्रकारची खाती उघडता येतात.

पोस्ट ऑफिस एमआयएस म्हणजेच मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूकदारांना दरमहा निश्चित व्याज मिळतं. हे व्याजाचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातात. आज आपण येथे जाणून घेऊया की पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत १ लाख रुपये जमा केल्यास दरमहा किती व्याज मिळेल.

पोस्ट ऑफिस त्यांच्या ग्राहकांना मासिक उत्पन्न योजनेवर ७.४ टक्के वार्षिक व्याज देत आहे. पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत किमान १००० रुपये जमा करता येतात. या योजनेअंतर्गत, एका खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा करता येतात.

जर तुम्ही संयुक्त खातं उघडलं तर तुम्ही त्यात जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा करू शकता. एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त ३ लोक समाविष्ट होऊ शकतात.

पोस्ट ऑफिसमध्ये एमआयएस खातं उघडण्यासाठी, तुमचं पोस्ट ऑफिसमध्येच बचत खातं असणं आवश्यक आहे. जर तुम्ही अद्याप पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडले नसेल, तर MIS योजनेत गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी तुम्हाला बचत खातं उघडावं लागेल.

पोस्ट ऑफिसची ही योजना ५ वर्षांत मॅच्युअर होते. जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या MIS योजनेत १,००,००० रुपये जमा केले तर तुम्हाला दरमहा ६१७ रुपये निश्चित व्याज मिळेल. यासोबतच, मॅच्युरिटीनंतर, तुमचे संपूर्ण १,००,००० रुपये देखील परत केले जातील.