Petrol Pump वरील व्यक्ती वारंवार हे नॉब दाबत असेल, तर फसवणूक होते का? पाहा काय आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 01:44 PM2023-04-07T13:44:30+5:302023-04-07T13:52:54+5:30

Petrol Pump Tips: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे जवळपास सर्वच जण हैराण झाले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपयांपेक्षा जास्त दराने विकले जात आहे.

सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं उच्चांकी स्तर गाठला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नसला तरी त्याचे दर अधिक आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे जवळपास सर्वच जण हैराण झाले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपयांपेक्षा जास्त दरानं विकलं जात आहे. आता जरा विचार करा की एवढं महाग पेट्रोल किंवा डिझेल घेतल्यानंतरही पेट्रोल पंपावर तुमची फसवणूक होत असेल तर काय वाटेल.

फसवणुकीचा अर्थ असा की तुम्ही जेवढ्याचं पेट्रोल भरायला सांगितलं आहे तेवढ्याचं पेट्रोल न येता तुम्हाला कमी पेट्रोल मिळणं. असं झालं तर कुणालाही वाईट वाटेल, रागही येऊ शकतो. त्यामुळे पेट्रोल पंपावर सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे.

मात्र, अनेकवेळा असे प्रकार घडतात, ज्यावरून आपल्याला आपली फसवणूक होतेय असं वाटतं. परंतु तसं होत नसतं. तुम्ही पाहिलं असेल की पेट्रोल पंप कर्मचारी वाहनात पेट्रोल भरताना नोझल नॉब वारंवार दाबत राहतो, तर अनेकवेळा तो नोझल वाहनात लावून सोडतो आणि पेट्रोल भरल्यावर वाहनातून नोझल बाहेर काढतो.

अशा परिस्थितीत पेट्रोल पंप कर्मचार्‍यानं वाहनाला लावलेलं नोझल सोडलं की, इंधन योग्य प्रकारे भरलं जात आहे असं लोकांना वाटतं, तर वाहनाला लावल्यानंतर नोझल धरून पुन्हा पुन्हा नॉब दाबत राहिल्यास आपली फसवणूक होत असल्याचं लोकांना वाटतं. परंतु, प्रत्यक्षात तसं होत नाही.

वास्तविक, पेट्रोल पंप कर्मचारी पेट्रोल भरताना वारंवार नोझलचा नॉब दाबतो, तेव्हा तो प्रत्यक्षात पेट्रोल पंपाच्या मशीनमधून येणारा दाब नियंत्रित करत असतो.

जर पेट्रोल मशीनमध्ये पहिल्यापासून कोणतीही गडबड नसेल तर वारंवार नॉब प्रेस केल्यानंतर पेट्रोल कमी किंवा जास्त भरलं जाणार नाही. मशीनमध्ये जितकं एन्टर केलंय तितकंच पेट्रोल तुम्हाला मिळेल.