आज घर चालवण्यासाठी ₹३०००० लागत असतील तर १० वर्षांनंतर किती लागतील? 'सेबी'च्या कॅल्क्युलेटरने समोर आला धक्कादायक आकडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:04 IST2026-02-20T15:51:38+5:302026-02-20T16:04:46+5:30
महागाईचा सामना करण्यासाठी केवळ काटकसरच पुरेशी नाही, तर...

आजच्या काळात एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा मासिक खर्च साधारणपणे ३०००० रुपयांमध्ये मॅनेज होऊ शकतो. यात, घरभाडे, रेशन, वीज-पाणी, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजांचा समावेश आहे. मात्र, महागाईचा वाढता वेग पाहता, याच जीवनशैलीसाठी आपल्याला १० वर्षांनंतर किती पैसा मोजावा लागेल याचा कधी विचार केला का? तर जाणून घेऊयात.

काळानुसार, व्यक्तीचे उत्पन्न वाढते, तसेच वस्तूंच्या किमतीही वाढतात आणि खर्चाचे स्वरूपही बदलते. यामुळे, केवळ आजच्या कमाईवर अवलंबून न राहता भविष्याचे नियोजन करणेही तेवढेच आवाश्यक आहे. महागाईचा तुमच्या मासिक बजेटवर कशा पद्धतीने परिणाम होतो? हे एका उदाहरणावरून स्पष्ट होते.

सामान्यतः दरवर्षी महागाईमध्ये सरासरी ६ ते ८ टक्क्यांची वाढ दिसून येते. 'सेबी इन्फ्लेशन कॅल्क्युलेटर'नुसार जर महागाई दर वार्षाला ७ टक्के धरला, तर आज एक विशिष्ट दर्जा राखण्यासाठी जो खर्च ३०००० रुपये होतो, तो १० वर्षांनंतर, तसाच दर्जा कायम ठेवण्यासाठी दरमहा ५९,०१५ रुपयांपर्यंत पोहोचेल.

अर्थात, पुढील १० वर्षांत आपल्याला दरमहा सुमारे २९,०१५ रुपये अतिरिक्त खर्च करावे लागणार आहेत. हा आकडा सध्याच्या खर्चाच्या जवळपास दुप्पट आहे.

म्हणजेच, महागाईचा सामना करण्यासाठी केवळ काटकसरच पुरेशी नाही, तर आपल्याला आपली कमाई देखील सातत्याने वाढवावी लागेल, असेही यावरून स्पष्ट होते.

महागाई आणि उत्पन्न यांचा योग्य ताळमेळ राखल्यास आपल्या मासिक बजेटवर अधिकचा भार पडणार नाही. परिणामी अशा पद्धतीच्या आगाऊ आर्थिक नियोजनाने, भविष्यातील वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी आपल्याला बळ मिळेल.

















