मर्जरनंतर अशी बदलणार IDFC First Bank, ग्राहक आणि शेअरहोल्डर्सवर होणार 'हा' परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 10:27 AM2023-07-05T10:27:04+5:302023-07-05T10:43:11+5:30

बँकेच्या ग्राहक आणि भागधारकांवर याचा काय परिणाम होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या संचालक मंडळानं आयडीएफसी लिमिटेड आणि आयडीएफसी फायनान्शियल होल्डिंग्सच्या विलीनीकरणाला मान्यता दिली आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहक आणि भागधारकांवर याचा काय परिणाम होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. व्याज आणि शेअरहोल्डिंग पॅटर्न कसा बदलेल? याची माहिती घेऊ.

आयडीएफसी फर्स्ट बँकेनं हे विलीनीकरण २०२३ मध्ये पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. मात्र, यासाठी त्याला आरबीआय व्यतिरिक्त सेबी, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया सारख्या प्रमुख नियामकांकडून मंजुरी घ्यावी लागेल.

आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून असं स्पष्ट करण्यात आलंय आहे की आयडीएफसी लिमिटेडच्या भागधारकांना प्रत्येक १०० शेअर्समागे आयडीएफसी फर्स्ट बँकेचे १५५ शेअर्स मिळतील. या शेअर्सची फेस व्हॅल्यू १० रुपये असेल.

आयडीएफसी लिमिटेडचा आयडीएफसी फर्स्ट बँकेत ४० टक्के हिस्सा आहे. विलीनीकरणानंतर, आयडीएफसी लिमिटेडचे ​​भागधारक थेट आयडीएफसी फर्स्ट बँकेचे भागधारक बनतील.

दरम्यान, हे बँकेसाठी देखील फायदेशीर आहे, बँकेत आयडीएफसी लिमिटेडच्या भागीदारीमुळे, त्यांच्या भागधारकांकडे बँकेचे शेअर्स १.६६ च्या प्रमाणात आहेत, तर विलीनीकरणानंतर ते १.५५ च्या प्रमाणात येतील.

विलीनीकरणानंतर, या सर्व कंपन्या आणि बँकेचा व्यवसाय स्ट्रीमलाईन होईल, ज्यानं रेग्युलेटरी कंप्लायन्सचं ओझं कमी होईल. परिणामी, भागधारकांना चांगला परतावा मिळेल. त्याच वेळी, आयडीएफसी फर्स्ट बँक एचडीएफसी बँक किंवा आयसीआयसीआय बँक सारखी मोठी खाजगी बँक म्हणून काम करू शकेल.

आयडीएफसी फर्स्ट बँकेचे एमडी आणि सीईओ व्ही. वैद्यनाथन यांच्यानुसार या विलीनीकरणानंतर बँकेचा कॅपिटल बेस वाढेल. बँकेची बूक ब्हॅल्यू प्रति शेअर ५ टक्क्यांनी वाढेल. यासोबतच आयडीएफसी लिमिटेडची ६०० कोटी रुपयांची रोकड देखील आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या खात्यात जमा केली जाईल.

त्याच वेळी, यामुळे बँकेला अधिक क्षेत्रांमध्ये आपली सेवा देण्यासाठी, ग्राहक संख्या आणि शाखा वाढवण्यात मदत होईल. बँकेचा निव्वळ नफा आता २४०० कोटी रुपयांच्या आसपास आहे. यासोबतच, कॅपिटल बेस वाढल्यामुळे, बँकेची जोखीम घेण्याची क्षमता वाढेल. यामुळे बँक ग्राहकांना स्पर्धात्मक व्याजदरावर कर्ज देऊ शकेल.