ICICI बँकेचं मार्केट कॅप ५ लाख कोटी रूपयांच्या पार; गुंतवणूकदारही झाले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 05:36 PM2021-09-01T17:36:30+5:302021-09-01T17:42:12+5:30

ICICI बँक ठरली ५ लाख कोटी रूपयांचा टप्पा ओलांडणारी दुसरी बँक. गुंतवणूकदारांना झाला मोठा नफा.

खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँक आयसीआयसीआय बँक लिमिटेडला (ICICI Bank Limited) मोठे यश मिळाले आहे. बँकेच्या मार्केट कॅपने ५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

आयसीआयसीआय ही मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असणारी दुसरी अशी बँक आहे ज्यांच्या मार्केट कॅपने हा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी एचडीएफसी बँकेच्या मार्केट कॅपने हा टप्पा ओलांडला होता. एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप ८ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

त्याचबरोबर आयसीआयसीआय बँक मुंबई शेअर बाजारामध्ये ५ लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपला ओलांडणारी सातवी भारतीय फर्म आहे.

यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लिमिटेड, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि इन्फोसिस लि. यांचा समावेश आहे.

यावर्षी आयसीआयसीआय बंकेच्या शेअर्समध्ये ३८ टक्क्यांपेक्षा अधिकची तेजी दिसून आली आहे. बँकेचा एक शेअर ७३४ रूपयांच्या पुढे गेला आहे. तर जानेवारी महिन्यात शेअरचा भाव ५३५ रूपये इतका होता. याचा अर्थ गेल्या आठ महिन्यांत बँकेच्या प्रत्येक शेअर मागे २०० रूपयांची वाढ झाली आहे.

बुधवारी बँकेच्या शेअरनं गेल्या ५२ आठवड्यांतला उच्चांकी स्तर गाठला होता. आयसीआयसीआय बँक झपाट्यानं वर येत आहे आणि विश्वासार्ह व्यवस्थापनामुळे गुंचतवणूदारांनाही उत्तम रिटर्न दिल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

Read in English