Hyundai Creta खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असावा? डाऊन पेमेंट आणि EMI किती पडेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:17 IST2026-03-18T13:08:25+5:302026-03-18T13:17:55+5:30

ह्युंदाई क्रेटाची एक्स-शोरूम किंमत १०.७९ लाखांपासून सुरू होऊन २०.२० लाखांपर्यंत जाते. मात्र, विमा, आरटीओ टॅक्स आणि इतर खर्च मिळून ऑन-रोड किंमत साधारणपणे १३.५० लाख ते १६ लाख रुपयांच्या घरात जाते.

बहुतेक बँका ऑन-रोड किमतीच्या ८०% ते ९०% कर्ज देतात. जर तुम्ही १५ लाख रुपयांचे मॉडेल निवडले, तर २०% डाऊन पेमेंटनुसार तुम्हाला सुरुवातीला किमान ३ लाख रुपये पदरचे भरावे लागतील. उरलेल्या १२ लाख रुपयांसाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल.

समजा तुम्ही १२ लाख रुपयांचे कर्ज ९% व्याजदराने ४ वर्षांसाठी (४८ महिने) घेतले, तर तुमचा मासिक हप्ता साधारण २९,८६२ रुपये इतका येईल. ४ वर्षांच्या काळात तुम्ही बँकेला मुद्दलाव्यतिरिक्त सुमारे २.३३ लाख रुपये फक्त व्याज म्हणून द्याल.

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, कारचा EMI तुमच्या हातात येणाऱ्या मासिक पगाराच्या १०% ते १५% पेक्षा जास्त नसावा. जर तुमचा हप्ता ३० हजार रुपये असेल, तर तुमचे मासिक उत्पन्न किमान २ लाख ते २.५ लाख रुपयांच्या दरम्यान असणे सुरक्षित मानले जाते.

जर तुमचा पगार १ लाख ते १.२५ लाखांच्या दरम्यान असेल आणि तुम्हाला क्रेटा घ्यायचीच असेल, तर डाऊन पेमेंटची रक्कम वाढवा. सुरुवातीला ६ ते ७ लाख रुपये भरल्यास कर्जाचा बोजा कमी होईल आणि EMI तुमच्या बजेटमध्ये बसेल.

केवळ हप्ता भरून जबाबदारी संपत नाही. दरमहा इंधन (पेट्रोल/डिझेल) आणि कारची सर्व्हिसिंग यासाठी अतिरिक्त ५,००० ते ८,००० रुपये खर्च गृहीत धरूनच आर्थिक नियोजन करावे.

दरवर्षी कारचा विमा नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला ३० ते ५० हजार रुपयांचा मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च तुमच्या मासिक बचतीतून बाजूला काढणे आवश्यक आहे.

जर तुमचा सिबिल स्कोर ७५० पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते. व्याजाचा दर १ टक्क्याने जरी कमी झाला, तरी तुमच्या एकूण परतफेडीत हजारो रुपयांची बचत होऊ शकते.