घरबसल्या बनवू शकता Ration Card, सरकार 2023 मध्ये सुद्धा देणार मोफत धान्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 02:09 PM2022-12-24T14:09:58+5:302022-12-24T14:27:07+5:30

Ration Card : सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली : येत्या वर्षात म्हणजेच 2023 मध्येही सरकार देशातील 80 कोटी लोकांना मोफत रेशन (Free Ration) देणार आहे. सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोफत रेशन एक वर्षासाठी वाढवले ​​आहे. सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.

रेशनकार्ड हे आपल्या ओळखीचे महत्त्वाचे दस्तऐवज असून मोफत रेशनसाठी आवश्यक आहे. रेशन कार्डशिवाय सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही अजून रेशन कार्ड बनवले नसेल तर तुम्ही ते सहज ऑनलाईन बनवू शकता.

रेशन कार्ड बनवणे आता खूप सोपे झाले आहे. यासाठी लोकांना आता सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. आता यासंबंधीची बहुतांश कामे ऑनलाइन केली जातात. तुम्ही ऑनलाईन रेशन कार्डसाठी (Online Ration Card) अगदी सहज अर्ज करू शकता आणि तुमच्या रेशन कार्डचे स्टेटस देखील पाहू शकता.

तुम्ही तुमच्या राज्याच्या अन्न, पुरवठा ग्राहक विभागाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे यासाठी अर्ज करू शकता. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्हाला http://mahafood.gov.in वर जाऊन तुमच्या रेशनकार्डसाठी अर्ज करावा लागेल. तुम्ही पोर्टलवर Apply for Online Ration Card चा ऑप्शन निवडून प्रक्रिया पूर्ण करू शकता.

जर तुम्ही उत्तर प्रदेशचे रहिवासी असाल तर https://fcs.up.gov.in/FoodPortal.aspx वेबसाइटला भेट द्या. होमपेजवर लॉग इन करा आणि 'NFSA 2013 अॅप्लिकेशन फॉर्म' वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला फॉर्मवर विचारण्यात आलेली सर्व माहिती भरावी लागेल.

तसेच, तुम्हाला तुमची कागदपत्रे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक खात्याचे डिटेल्स अपलोड करावे लागतील. यानंतर तुम्हाला ऑनलाइन रेशन कार्ड फी भरावी लागेल. फी भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करू शकता.

अशा प्रकारे रेशन कार्ड बनवण्यासाठी तुमचा अर्ज केला जाईल. अर्जदाराला वेगवेगळ्या कॅटगरीनुसार 5 रुपये ते 45 रुपये फी भरावी लागते. तुमचा अर्ज आणि त्यात दिलेली माहिती फील्ड ऑफिसरकडून व्हेरिफाय केली जाईल. माहिती योग्य असल्यास महिनाभरात तुम्हाला रेशन कार्ड दिले जाईल.

रेशनकार्ड दिल्यानंतर तुम्ही शासकीय वितरण केंद्रातून मोफत रेशन घेऊ शकता. तुमच्या रेशन कार्डवर चार जणांची नावे नोंदवली गेल्यास प्रत्येक व्यक्तीला पाच किलो रेशन दिले जाईल. रेशनकार्डशी आधार लिंक करणेही आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्याकडेही आधार कार्ड असायला हवे.

केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, सरकार तांदूळ, गहू आणि भरड धान्य अनुक्रमे 3,2,1 रुपये प्रति किलो दराने पुरवते. सरकारने ठरवले आहे की, डिसेंबर 2023 पर्यंत ते पूर्णपणे मोफत मिळेल.