पीएफ खात्यात किती रक्कम जमा झालीय? घरबसल्या एका 'मिस्ड कॉल'वर मिळवा माहिती

By मोरेश्वर येरम | Published: November 29, 2020 02:10 PM2020-11-29T14:10:15+5:302020-11-29T14:24:09+5:30

तुमच्या पीएफ खात्यात नेमकी किती रक्कम जमा झालीय याची माहिती मिळवायचीय? मग ही सोपी पद्धत नक्कीच ट्राय करुन पाहा तुम्हाला सर्व माहिती घरबसल्या मिळू शकेल.

कोरोना संकटात जर तुम्ही भविष्यनिर्वाह निधी अर्थात पीएफ काढण्याचा विचार करत आहात? पण तुम्हाला तुमच्या खात्यात किती रक्कम जमा झालीय हे माहित नाहीय? मग त्यासाठी तुम्हाला EPFO च्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. अवघ्या काही सेकंदात तुम्हाला घरबसल्या तुम्हाला माहिती मिळू शकते. तुम्ही ज्या कंपनीत काम करताय त्या कंपनीने तुमच्या पीएफ खात्यात रक्कम जमा केलीय की नाही हेही तुम्हाला सहज कळू शकतं.

पीएफ खातेधारकाने खरंतर दर महिन्यातून एकदा तरी आपल्या खात्यात नेमकी किती रक्कम जमा झालीय याची माहिती घ्यायला हवी. ही सेवा सरकारकडून अगदी विनामुल्य दिली जाते. यासाठी स्मार्टफोनच असायला हवा अशीही काही गरज नाही. पीएफ खात्यात नोंदणी केलेला मोबाइल क्रमांक तुम्हाला माहित असणं फक्त आवश्यक आहे.

पीएफ खात्यातील रक्कम हा तुमच्या कमाईतील एक मोठा वाटा असतो. नोकरदार वर्गाच्या खात्यातून दर महिन्याला ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा होत असते. पण पीएफ बाबत अनेकांच्या मनात आजही काही प्रश्न निर्माण होतात. कोणत्या महिन्यात किती पीएफ जमा झाला? कंपनीने किती पैसे जमा केले? सध्या किती रक्कम जमा आहे? असे अनेक प्रश्न नोकरदार वर्गात पाहायला मिळतात. आता तुम्ही आपल्या फोनच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता.

केवळ एक मिस्ड कॉल देऊन तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची सर्व माहिती मिळवू शकता. EPFO ने ०११-२२९०१४०६ हा क्रमांक जारी केला आहे. तुम्हाला फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन यावर मिस्ड कॉल द्यायचा आहे. EPFO ने दिलेल्या क्रमांकावर जसं तुम्ही कॉल करता तेव्हा काही सेकंदात तुमचा फोन आपोआप कट होतो आणि तुमच्या पीएफ खात्याची माहिती तुम्हाला मोबाइल मेसेजच्या माध्यमातून दिली जाते.

'मिस्ड कॉल'सोबत SMS च्या माध्यमातूनही पीएफ खात्यातील जमा राशीची माहिती मिळवता येते. यासाठीही EPFO कडून एक क्रमांक जारी करण्यात आला आहे. EPFO मध्ये नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावरुन तुम्हाला ७७३८२९९८९९ या क्रमांकावर एक मेसेज सेंड करायचा आहे. त्यानंतर तात्काळ तुम्हाला EPFO कडून पीएफमधील तुमचं योगदान आणि जमा राशीची संपूर्ण माहिती पाठविण्यात येईल.

SMS पाठविण्याची पद्धत देखील अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला मेसेजमध्ये 'EPFOHO UAN' लिहून ७७३८२९९८९९ या क्रमांकावर तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे. ही सुविधा इंग्रजी, हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलगु, तमीळ, मल्ल्याळम आणि बंगाली अशा एकूण १० भाषांमध्ये उपलब्ध आहे.

तुम्हाला जर इंग्रजीत माहिती हवी असेल तर मेसेजमध्ये EPFOHO UAN ENG असं टाइप करावं लागेल. शेवटची तीन अक्षरं (ENG) ही तुम्हीला इच्छित असलेल्या भाषेबाबतची माहिती देतात. मेसेजच्या शेवटी ENG असं लिहिल्यास तुम्हाला इंग्रजीतून मेसेज येईल. HIN असं लिहील्यास हिंदीतून तर MAR असं लिहील्यास मराठीतून माहिती उपलब्ध होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की UAN म्हणजे आपला यूएएन क्रमांक टाइप करायचा नाहीय. तर मेसेजमध्ये फक्त UAN असं टाइप करायचं आहे.