कच्च्या तेलापासून ते तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत; असा तयार होतो 'LPG' गॅस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:58 IST2026-03-11T12:54:03+5:302026-03-11T12:58:47+5:30

LPG gas Crisis : मध्यपूर्वेतील युद्धामुळे सध्या भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी देशात गॅश रेशनिंगचा नियम लागू करण्यात आला आहे. आपल्या घरात वापरला जाणारा एलपीजी नेमका कसा तयार होतो, हे जाणून घेणे रंजक आहे. गॅस सिलेंडरमधील हा इंधन वायू नैसर्गिक वायूचे शुद्धीकरण आणि कच्च्या तेलाच्या रिफायनिंग प्रक्रियेतून मिळवला जातो.

एलपीजीचे स्वरूप : एलपीजी हा प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन या दोन हायड्रोकार्बन वायूंचे मिश्रण असतो. हे वायू नैसर्गिकरीत्या जमिनीखाली सापडतात.

जेव्हा जमिनीतून नैसर्गिक वायू काढला जातो, तेव्हा त्यासोबत प्रोपेन आणि ब्युटेन देखील असतात. हे वायू वेगळे करून एलपीजी तयार केला जातो.

रिफायनरीमध्ये जेव्हा कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते, तेव्हा ते तापवून त्याचे विविध भागांत विभाजन केले जाते. या प्रक्रियेत सर्वात वरच्या थरात एलपीजी वायू मिळतो.

नैसर्गिक अवस्थेत हे घटक वायू स्वरूपात असतात. परंतु, त्यांच्यावर उच्च दाब देऊन त्यांचे रूपांतर द्रवात केले जाते, म्हणूनच याला 'लिक्विफाइड' पेट्रोलियम गॅस म्हणतात.

गॅस तयार करताना त्यातील पाणी, हायड्रोजन सल्फाईड आणि इतर घातक अशुद्धी काढून टाकल्या जातात, जेणेकरून तो वापरण्यास सुरक्षित राहील.

नैसर्गिक एलपीजीला कोणताही वास नसतो. गॅस गळती झाल्यास ती त्वरित लक्षात यावी, यासाठी त्यात मुद्दाम 'इथिल मरकॅप्टन' नावाचा उग्र वासाचा पदार्थ मिसळला जातो.

तयार झालेला हा द्रव वायू मोठ्या आकाराच्या गोलाकार किंवा दंडगोलाकार टाक्यांमध्ये साठवला जातो.

साठवलेला हा द्रव वायू पाइपलाइनद्वारे रिफिलिंग प्लांटमध्ये पाठवला जातो, जिथे तो घरगुती किंवा व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जातो.

एलपीजीचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा त्याचे द्रवात रूपांतर होते, तेव्हा त्याचे आकारमान २५० पटीने कमी होते. यामुळे छोट्या सिलेंडरमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवता येते.

कोळसा किंवा लाकडाच्या तुलनेत एलपीजी जळताना खूप कमी प्रदूषण करतो आणि धूर सोडत नाही, म्हणून याला 'स्वच्छ इंधन' मानले जाते.