सात शहरांतील घरांच्या विक्रीमध्ये दुपटीने झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 12:38 PM2021-10-01T12:38:34+5:302021-10-01T12:47:06+5:30

सात शहरांमध्ये सरासरी किमतीत तीन टक्के वाढ

जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशातील प्रमुख ७ शहरांतील घरांची विक्री दुपटीने वाढून ६२,८०० युनिटवर गेली. याच कालावधीत घरांच्या सरासरी किमतीत ३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मालमत्ता क्षेत्रातील सल्लागार संस्था ‘ॲनारॉक’ने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, गृहकर्जाच्या व्याज दरात झालेली कपात आणि आयटी व तंत्रज्ञान क्षेत्रातील जबरदस्त नोकर भरती यामुळे सात प्रमुख शहरांतील घरांची मागणी वाढली आहे. त्याचा हा परिणाम आहे.

गेल्या वर्षीच्या या कालावधीत २९,५२० घरांची, तर आदल्या तिमाहीत २४,५६० घरांची विक्री झाली होती.

सर्वेक्षण करण्यात आलेल्या सात शहरात दिल्ली-एनसीआर, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर), चेन्नई, कोलकता, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे यांचा समावेश आहे. या सात शहरांतील घरांच्या किमती ३ टक्क्यांनी वाढून सरासरी ५,७६० चौरस फूट झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या या कालावधीत हे दर ५,६०० रुपये चौरस फूट होते.

‘ॲनारॉकचे चेअरमन अनुज पुरी यांनी सांगितले की, सात प्रमुख शहरांतील आयटी व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली जात आहे.

त्याचा परिणाम म्हणून या क्षेत्रातील व्यावसायिकांच्या वेतनात मोठी वाढ झाली आहे. रोजगाराची सुरक्षा वाढल्यामुळे लोक घरे खरेदी करण्याचे धाडस करीत आहेत.

दिल्ली-एनसीआरमधील घर विक्री ९७ टक्क्यांनी वाढून १०,२२० युनिटवर गेली. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये गेल्या वर्षीच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत ९,२०० घरे विकली गेली होती. यंदा हा आकडा वाढून २०,९६५ झाला आहे. पुण्यातील घरांची विक्री १०० टक्क्यांनी वाढून ९,७०५ युनिटवर गेली आहे.