ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 10:11 IST2025-09-24T10:01:31+5:302025-09-24T10:11:43+5:30

ऑनलाइन ऑर्डरमध्ये मोठी वाढ, ३५ वर्षांत प्रथमच लोकांकडून ८०,००० चौकशा, जीएसटी दरात कपातीचा फायदा कंपन्यांनी न दिल्यास केंद्र सरकार करणार कारवाई; सामान्य ग्राहकांना झाला मोठा फायदा

देशात २२ सप्टेंबरपासून अमलात आलेल्या जीएसटी २.० सुधारणांमुळे दैनंदिन वापरातील वस्तू (एफएमसीजी), आरोग्यसेवा, वैयक्तिक देखभाल, पर्यटन व घरबांधणी या क्षेत्राला लाभ झाल्याचे चित्र असून, बाजारात ग्राहकांची झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला आहे तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंचे ५ व १० रुपयांचे पॅक बाजारातून गायब झाले आहेत.

जीएसटी २.० सुधारणांमुळे कररचनेत मोठे बदल झाले आहेत. नव्या व्यवस्थेनुसार जीएसटीचे फक्त ५ व १८ टक्के असे दोनच दर राहिले असून, अनेक अत्यावश्यक वस्तूंवरील कर शून्य झाला आहे. खर्चात बचत होऊन ग्राहकांची क्रयशक्ती वाढण्याची अपेक्षा आहे.

उद्योग जगतही करसवलतींचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला ‘जीएसटी सेव्हिंग फेस्टिव्हल’ असे संबोधत गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, व्यापारी आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

जीएसटी २.० लागू होताच ५ व १० रुपयांचे पॅक गायब - दैनंदिन ग्राहक वस्तू (एफएमसीजी) क्षेत्रातील लोकप्रिय असलेले ५ रुपये व १० रुपयांचे पॅक बाजारातून गायब झाले आहेत. पार्ले-जीने २० वर्षांनंतर आपले ५ रुपयांचे बिस्किट पॅक ४.४५ रुपयांना केले आहे. तसेच १ रुपयाची गोळी आता ८८ पैशांना व २ रुपयांचा शॅम्पू पाउच १.७७ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना फायदा मिळणार आहे.

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी उसळली गर्दी - जीएसटी २.० दरकपातीमुळे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मारुती सुझुकी, टाटा मोटर्स व ह्युंदाई या कंपन्यांच्या वाहनांची ऐतिहासिक विक्री झाली. मारुतीने एका दिवसात २५,००० गाड्या विक्री केल्या. मारुती लवकरच ३०,००० गाड्यांच्या विक्रीचा आकडा गाठील, असा अंदाज आहे. 

टाटा मोटर्सने १०,००० वाहनांची डिलिव्हरी केली, तर ह्युंदाईने ११,००० डीलर बिलिंग्स नोंदवून पाच वर्षांतील सर्वोच्च कामगिरी केली. वापरलेल्या वाहनांच्या बाजारातही ४०० टक्के वाढ झाली. उत्सवी हंगाम व जीएसटी सवलतींच्या संयोगामुळे मागणी प्रचंड वाढली आहे. इलेक्ट्रॉनिक्सची उत्सवी खरेदी वाढली : ‘हायर’ने सोमवारी जवळपास दुप्पट विक्री नोंदवली. ब्ल्यू स्टारने वार्षिक तुलनेत २० टक्के वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त केला. 

अन्नपदार्थ आणि एफएमसीजी : पनीर, बटर, दूध, सुका मेवा यांसारख्या आरोग्यदायी अन्नपदार्थांवर कर ५ टक्के किंवा शून्य झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात खप वाढेल, असे उद्योग मानतात. शिक्षण : वह्या, पेन्सिल, खोडरबर यांसारखे शालेय साहित्य पूर्णपणे करमुक्त झाले आहे. त्यामुळे कुटुंबांचा खर्च कमी होईल आणि मुलांना शिक्षण अधिक परवडेल.

आयटी, इलेक्ट्रॉनिक्स : संगणक, लॅपटॉप, मोबाइल आदी इलेक्ट्रॉनिक्सवरील कर १८ टक्क्यांवर आणला आहे. यामुळे कंपन्यांना दिलासा मिळेल आणि ग्राहकांना वस्तू स्वस्तात मिळतील. सौरऊर्जा : सौर पॅनेल, बॅटरी, इन्व्हर्टरवरील कर कमी झाल्याने स्वच्छ उर्जा अधिक स्वस्त होणार आहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’लाही चालना मिळेल. 

आरोग्य क्षेत्र : ३३ औषधे, डायग्नॉस्टिक किट्सवर कर पूर्णपणे हटवला आहे. आरोग्य विमा करमुक्त झाला आहे. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने (एआयओसीडी) सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. इतर क्षेत्रे : वीज प्रकल्पांसाठी लागणारे ट्रान्सफॉर्मर, केबल्स यांवरील कर ५ टक्के झाला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात घरखरेदीला चालना मिळेल. डिजिटल साधने स्वस्त मिळतील.

५ क्षेत्रांना दिलासा, सामान्यांसाठी मोठी बचत - वाहन क्षेत्रात चार मीटरपेक्षा लहान पेट्रोल कार, एंट्री-लेव्हल बाइक यांचे दर घटले आहेत. खरेदी वाढली आहे. सिमेंट व ग्रॅनाइटवरील कर कमी झाल्यामुळे घरे व घरबांधणी स्वस्त होणार आहे. त्यामुळे स्वप्नपूर्ती शक्य होणार, वैयक्तिक आरोग्य व जीवनविमा हप्ता आता करमुक्त झाल्याने प्रीमियम कमी होईल. नागरिकांना थेट फायदा होणार, हॉटेल रूमवरील (७,५०० रुपयांपर्यंत) जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के झाल्याने पर्यटन अधिक किफायतशीर, टुथपेस्ट, साबण, बिस्किटे, शॅम्पू इत्यादी दैनंदिन वापरातील (एफएमसीजी) वस्तू स्वस्त झाल्या आहेत.

टॅग्स :जीएसटीGST