गुंतवणूकदारांचा पुन्हा सोन्यावरच भर! चांदीतून काढला जातोय पैसा; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:32 IST2026-02-11T11:29:53+5:302026-02-11T12:32:07+5:30

Gold Silver Price : वर्ष २०२५ मध्ये चांदीने १७०% असा विक्रमी परतावा दिला होता, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, २०२६ च्या सुरुवातीला चांदीचा वेग मंदावला असून ती केवळ १०% वाढली आहे, तर सोन्याने १५% ची स्थिर आणि मजबूत वाढ नोंदवली आहे.

जागतिक राजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोने हे जगातील सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. जेव्हा बाजारात अस्थिरता असते, तेव्हा गुंतवणूकदार चांदीसारख्या जोखमीच्या पर्यायापेक्षा सोन्याला अधिक पसंती देतात.

चांदीचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल उपकरणे आणि सौर ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात मंदीची साशंकता निर्माण होताच चांदीचे भाव वेगाने खाली येतात. ही 'व्होलॅटिलिटी' (चढ-उतार) सर्वसामान्य गुंतवणूकदारांना धास्तावणारी ठरत आहे.

२०२६ च्या आकडेवारीनुसार, 'सिल्व्हर ईटीएफ'मधून गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेत आहेत. याउलट, 'गोल्ड ईटीएफ'मध्ये नवीन गुंतवणूक येत आहे किंवा ती स्थिर आहे. हे स्पष्टपणे दर्शवते की गुंतवणूकदारांचा ओढा आता सुरक्षिततेकडे आहे.

सध्या गोल्ड-सिल्व्हर रेशो कमी होत आहे. याचा अर्थ असा की, चांदीची मोठी वाढ आधीच होऊन गेली आहे आणि आता ती महत्त्वाच्या तांत्रिक स्तरांच्या खाली व्यापार करत आहे. दुसरीकडे, सोने आपल्या मजबूत सपोर्टवर टिकून आहे.

चीनची मध्यवर्ती बँक आणि जगातील इतर प्रमुख बँका आपल्या परकीय चलन साठ्यात सोन्याचे प्रमाण सातत्याने वाढवत आहेत. बँकांकडून होणारी ही मोठी खरेदी सोन्याच्या किमतीला दीर्घकाळ आधार देणारी ठरणार आहे.

सोन्यामध्ये गुंतवणूक करणे आणि गरजेच्या वेळी ते विकून रोख रक्कम मिळवणे चांदीच्या तुलनेत अधिक सोपे आणि स्थिर मानले जाते. चांदीच्या मोठ्या साठवणुकीसाठी जागा जास्त लागते आणि फिजिकल चांदी विकताना शुद्धतेचे निकष अधिक कडक असतात.

जर तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये स्थिरता आणि मध्यम जोखीम हवी असेल, तर सोने हा उत्तम पर्याय आहे. मात्र, जर तुमची जोखीम घेण्याची क्षमता मोठी असेल आणि तुम्ही लांब पल्ल्याचा विचार करत असाल, तरच चांदीचा विचार करावा, पण त्यात गुंतवणूक करताना कमालीची सावधानता बाळगणे आवश्यक आहे.